युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव !

पुनीत बालन यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देतांना सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी.एस्. राजू

पुणे – काश्मीर खोर्‍यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विकासकामांत योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी.एस्. राजू यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्या माध्यमातून पुनीत बालन हे सामाजिक काम करत आहेत. ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराकडून चालवण्यात येणार्‍या १० शाळा त्यांनी चालवण्यासाठी घेतल्या असून त्यांना अर्थसाहाय्य केले जात आहे. या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी या अतिरेक्यांचा सर्वांत अधिक धोका (हाय मिलेटिन्स) असलेल्या भागात शाळा आहेत.

बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कूलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. काश्मीर खोर्‍यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी बालन ग्रुपच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्यात येते. प्रजासत्ताकदिनी अतिरेक्यांचा अधिक धोका असलेल्या शोपियानमध्ये २५० फूट उंचीचा तिरंगा ध्वजही उभारला आहे.

बालन म्हणाले की, भारतीय सैन्य दलासाठी काम करण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्यच समजतो. सैन्य दलासमवेत नवीन काश्मीर घडवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते निश्चितपणे मी करीन. मिळालेले प्रशस्तीपत्रक माझे मनोबल वाढवेल.