‘श्रद्धा’ ही मानवी मनापेक्षाही मोठी शक्ती असून श्रद्धेमुळे आत्मज्ञान होणे सहजशक्य असणे

‘साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव या गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भातील कु. श्रद्धा लोंढे हिने ११.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लिहिलेला लेख वाचून मला पुष्कळ शिकायला मिळाले. या लेखातून आणि काही ग्रंथांमधूनही शिकायला मिळालेले श्रद्धेचे महत्त्व येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. अनिल पाटील

१. रज आणि तम या गुणांची मानवाला मर्यादित स्वरूपात आवश्यकता असून ही मर्यादा ठरवण्याचे कार्य करणारी महाशक्ती म्हणजे ‘श्रद्धा’ असणे आणि श्रद्धा वाढली, तर क्रूरतेचे रूपांतर ममता या गुणामध्ये होणार असणे

श्रद्धा ही एक महाशक्ती आहे. ही शक्ती अनेकदा सात्त्विकतेकडे जात असते. रज आणि तम हे गुण मानवाला विनाशाच्या खाईत लोटणारे असतात; परंतु त्यांनाही महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे गुण शून्य झाले, तर जगणे अशक्य होईल आणि त्यांचा अतिरेक झाला, तर विनाश होईल; म्हणून त्यांची आवश्यकता मर्यादित स्वरूपात असणे आवश्यक आहे. ही मर्यादा ठरवण्याचे आणि प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करणारी मनापेक्षा मोठी महाशक्ती म्हणजे श्रद्धा होय ! ‘श्रद्धा’ वाढली, तर क्रूरतेचे रूपांतर ‘ममता’ या गुणामध्येही होईल.

२. श्रद्धेचे महत्त्व

अ. ‘श्रद्धा’ दृढ झाल्यावर माणसामध्ये सात्त्विक गुणांचा उदय होतो. श्रद्धेमुळे व्यक्ती शांत आणि प्रेमळ बनते.
आ. ‘श्रद्धा’ ही भौतिक वृत्तींना आवर घालणारी महाशक्ती असून ती सूक्ष्म आणि सात्त्विक शक्तींना तेजःपुंज करणारी आहे.
इ. श्रद्धा अनुभूतींना दृढ करण्याचे काम करते. मनुष्य अनुभूतींच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीकडे वळत असतो.
ई. कुठल्याही स्तरावरील ज्ञानाच्या गर्भात प्रवेश होताच मानवाला आत्मज्ञानाचा स्पर्श होतो. ज्ञानातून मोक्ष मिळतो. श्रद्धेविना मोक्षज्ञान मिळत नाही.
उ. ईश्वरावर दृढ श्रद्धा असणारा माणूस पुण्यकर्मे करत रहातो, किंबहुना तो जे करतो, ते पुण्यकर्मच असते; कारण त्यात कपट आणि स्वार्थ नसतो.
ऊ. श्रद्धा ही अशी शक्ती आहे की, ती माणसाला निर्मळ करते आणि निर्मळ व्यक्तीच आध्यात्मिक अनुभूतीची अधिकारी होऊ शकते. श्रद्धेचे महत्त्व हे असे आहे.

३. व्यक्तीविषयी श्रद्धा व्यक्तीगत आणि सीमित उद्धार करणारी असून वाक्यावरील श्रद्धा उद्धाराचे क्षितिज अधिक व्यापक करणारी असणे 

माणसाची कुठेतरी श्रद्धा असते किंवा असावी. व्यक्तीविषयीची श्रद्धा व्यक्तीगत आणि सीमित असते; परंतु वाक्य म्हणजे बोध असल्याने वाक्यावरील श्रद्धा व्यक्तीचा उद्धार करण्याचे क्षितिज अधिक व्यापक करते. सर्वांत श्रेष्ठ प्रतीचे उद्धारक वाक्य ‘तत्त्वमसि किंवा सोहम्’ हे होय ! दोन्हीचा अर्थ एकच आहे. एक दुसर्‍याला उद्देशून आहे आणि दुसरे स्वतःला उद्देशून आहे. ‘ते तू आहेस’ आणि ‘मी ते आहे.’ भाव एकच. याला ‘महावाक्य’ म्हणतात.

४. प्रबोधनकारी गुरुवाक्य म्हणून श्रद्धा असेल, तर त्याच्या वाचनातून ध्यास लागतो, ध्यासातून चिंतन घडते आणि चिंतनातून वृत्ती सिद्ध होते 

सद्गुरु श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारी वृत्ती निर्माण करतात आणि त्यासाठी आधार म्हणून लघु अन् तत्त्वार्थाने महान असे वाक्य देतात. त्यावर श्रद्धा हवी. ‘तत्त्वमसि’ किंवा ‘सोहम्’ ही वाक्ये कुठेही वाचनात येतील, त्याचा परिणाम होईलच, असे नाही; परंतु प्रबोधनकारी गुरुवाक्य म्हणून श्रद्धा असेल, तर त्याच्या वाचनातून ध्यास लागतो, ध्यासातून चिंतन घडते आणि चिंतनातून वृत्ती निर्माण होते. अशा वृत्तीतूनच मनुष्यवृत्ती शून्य होऊन आत्मज्ञान होते.

मी कु. श्रद्धा लोंढे हिला म्हणालो, ‘‘तुझ्या वडिलांनी तुझे नाव दूरदर्शीपणे ‘श्रद्धा’, असे ठेवले आहे. त्यांना नमस्कार आणि तुझे आडनावसुद्धा लोंढे, म्हणजे ‘सर्वत्र श्रद्धेचे लोंढे येवोत.’’ ‘सर्वत्र श्रद्धेचे लोंढे येऊन हिंदु राष्ट्राची पहाट लवकर येवो,’ हीच श्री गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अनिल पाटील (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७६ वर्षे) नाशिक.