कोणत्या प्रकारच्या पोटदुखीमध्ये पाणी पिऊ नये ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०१

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

‘लेखांक ९७ मध्ये एकाएकी उद्भवणारी पोटदुखी आणि पाणी’ यामध्ये ‘एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे’, असा उपचार दिला होता. अपचन किंवा लहान मूतखडा अडकल्याने पोटात दुखत असेल, तर या उपचाराने त्रास न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हा उपचार करण्यापूर्वी पोटाचा गंभीर विकार नाही ना, याची निश्चिती करावी. यासंदर्भात नगर येथील शल्यचिकित्सक आणि जठरांत्ररोगतज्ञ (गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट) आधुनिक वैद्य रवींद्र भोसले यांनी पुढील माहिती पाठवली आहे. यासाठी मी आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले यांच्याप्रती कृतज्ञ आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०२२)


पोटाच्या गंभीर विकारामध्ये पाणीसुद्धा पिणे धोक्याचे

आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, उदा. जठराचा व्रण (अल्सर) फुटणे. अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले, शल्यचिकित्सक आणि जठरांत्ररोगतज्ञ (गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट), नगर (२४.११.२०२२)