निरोगी जीवनासाठी व्यायाम – २८
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यांतून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics)चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.
१५ नोव्हेंबर या दिवशीच्या लेखांकात आपण ‘चालण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती अन् त्यांमुळे होणारे लाभ, तसेच हानी’ समजून घेतली. या लेखात आपण आरोग्यविषयक जाणीवेचे महत्त्व आणि आवश्यकता पाहू.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/854778.html
१. सदसद्विवेकबुद्धीच्या खालोखाल आरोग्यविषयक जाणीव असणे महत्त्वाचे !
‘जीवनात तुमचे काहीही ध्येय असो, सर्वांगीण यश, आध्यात्मिक प्रगती किंवा साधे सुखी जीवन…! सदसद्विवेकबुद्धी ही सर्वांत महत्त्वाची असते; पण त्या खालोखाल किंवा तिचाच एक भाग म्हणा, ‘आवश्यक असते, ती म्हणजे आपली आरोग्यविषयक जाणीव !’ आपल्यापैकी पुष्कळ जण या दोन्हींकडे लक्ष देत नाहीत.
२. बहुतेकांना नैतिक वर्तनाची जाणीव असणे; परंतु आरोग्यहरण करणार्या व्यसनांपासून दूर रहाणे न जमणे
आपल्यापैकी बहुतेकांना नैतिक वर्तनाची जाणीव असते. ‘चोरी करणे, मारणे, खोटे बोलणे किंवा व्यभिचार करणे, या अनैतिक गोष्टी करू नयेत’, अशी आपली सदसद्विवेकबुद्धी सांगत असते; पण आरोग्याविषयीची जाणीव फारच थोड्यांना असते. काहींना मद्यपान, तंबाखूचे सेवन यांसारखी जीवघेणी व्यसने असतात; तर बहुतेकांना दैनंदिन जीवनातील चहा, कॉफी, अत्याहार (आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न ग्रहण करणे), उशिरा उठणे, जागरण करणे, शीतपेये (कोल्डड्रींक) पिणे आणि अशी शेकडो आरोग्यहरण करणारी व्यसने यांपासून दूर रहाणे जमत नाही.
३. ‘आत्म्याची ज्या निष्ठेने आपण काळजी घेतो, तितकीच काळजी देहरूपी मंदिराची घेणे’, हे आपले उत्तरदायित्व असणे
प्रामाणिकपणे विचार करा…! ‘आपण आपल्या दैनंदिन सवयींचा आरोग्यविषयक जाणीवेने विचार करतो का ?’ शरिराची आणि आत्म्याची काळजी घेणे, हे सारखेच महत्त्वाचे आहे. आपले शरीर हे देवाचे देऊळ आहे. त्यात तो परमात्मा वास करतो. तेव्हा देवमूर्ती इतकेच तुम्ही तुमचे शरीर पवित्र मानले पाहिजे आणि ‘आपल्या आत्म्याची ज्या निष्ठेने आपण काळजी घेतो, तितकीच काळजी देहरूपी मंदिराची घेणे’, हे आपले उत्तरदायित्व आहे. जर तुम्हाला चांगले आरोग्य पाहिजे असेल, तर अशा प्रकारची जाणीव तयार करणे, हे तुमचे कर्तव्यच आहे.
३ अ. यासाठी पाळावयाचे महत्त्वाचे नियम…
१. आपल्या शारीरिक श्रमांच्या प्रमाणात आपला आहार ठरवून त्या प्रकारचे अन्न केवळ जेवतांनाच घेणे
२. स्वच्छ पाणी पुष्कळ पिणे
३. प्रत्येक दिवशी एक ते दीड घंटा (शक्य झाले, तर मोकळ्या हवेत) व्यायाम करणे
४. दिवसभरात भरपूर मोकळ्या हवेत वावरणे
५. ईश्वरावर ठाम श्रद्धा ठेवून दिनचर्या पार पाडणे
६. आवश्यक तितकी झोप पूर्ण करणे
७. शरिरातील सर्व भागांतून उत्साहाचे विद्युत्किरण संचारत रहातील, अशा प्रकारचे हितकारक बौद्धिक विचार/कृती करणे.
आरोग्यविषयक जाणीव उत्पन्न होण्यासाठी वरील सूची लक्षात ठेवा आणि ही सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून दैनंदिन उद्योग करा.
३ आ. ‘निसर्गनियमांच्या विरोधात जाणे किंवा त्यांकडे दुर्लक्ष करणे’, हे अज्ञान आणि अहंकार यांचे चिन्ह असणे : ‘दिवसभर आपल्या शरिराविषयीच विचार करत रहावे’, असा याचा विपरीत अर्थ घेऊ नये. याउलट निसर्गाच्या नियमाला अनुसरून विचारप्रक्रिया आणि दिनचर्या ठेवली, तर शरीर आपल्या सर्वांगीण प्रगतीला साहाय्य करील. लक्षात ठेवा, ‘निसर्गनियमांच्या विरोधात जाणे किंवा त्यांकडे दुर्लक्ष करणे’, हे उदात्ततेचे लक्षण नव्हे, तर ‘अज्ञान’ आणि ‘अहंकार’ यांचे चिन्ह आहे.’
या साध्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या शरिराची काळजी घ्या आणि नैमित्तिक कर्मांनी चांगले आरोग्य मिळवा.
४. आरोग्यादि मिळवण्यासाठी स्वतःच्या आरोग्यविषयक जाणीवेला शिक्षण देण्यास आरंभ करा !
शरिरारोग्य हे काही एकदम कुठून तरी घाऊक मिळणारी वस्तू नाही. तुम्हाला ती पैसे खर्चूनही मिळणार नाही. तुम्हाला ती कुणाकडून देणगी म्हणून मिळणार नाही; पण जसे शुद्ध शील आपल्या सदसद्विवेकबुद्धीचे आदेश काळजीपूर्वक पाळल्याने मिळवता येते, तसेच आरोग्यादि मिळविता येईल, तर मग त्या प्रकारे आपल्या जाणिवेला ‘शिक्षण देण्यास आरंभ का करत नाही ?’
(साभार : शं. धों. विद्वांस, संपादक, मासिक ‘व्यायाम’, १५.२.१९५७)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise