सौंदत्ती यात्रेसाठी खोळंबा आकार ६० रुपयांवरून १० रुपयांवर ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन महामंडळ

राजेश क्षीरसागर

कोल्हापूर – कर्नाटकात होणार्‍या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर येथून सहस्रो भाविक प्रतिवर्षी जातात. प्रतिवर्षी या यात्रेस किमान २०० बसगाड्या जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार (बस एका जागेवर थांबून रहाते, त्यासाठी करण्यात येणारी आकारणी) आणि एस्.टी. भाडे यांविषयी भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केल्यानंतर सौंदत्ती यात्रेचा खोळंबा आकार ६० रुपये प्रतिघंटावरून आता केवळ १० रुपये द्यावा लागणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या नवीन दर आकारणीप्रमाणे प्रत्यक्ष चालवण्यात आलेल्या किलोमीटरसाठी ५५ रुपये बसभाडे आणि खोळंबा आकार १० रुपये द्यावा लागणार आहे. यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे. ही विशेष सवलत वर्ष २०२२ मधील यात्रेसह वर्ष २०२३ मधील माघ मासातील सौंदत्ती यात्रेसाठीही कायम ठेवण्यात आली आहे.