भगवंताची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळेच ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ लेखमालिकेचे १०० भाग पूर्ण !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १००

भगवान धन्वन्तरि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा, तसेच वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळे ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचा शंभरावा भाग आज प्रकाशित होत आहे. १० जुलै २०२२ पासून चालू झालेल्या या लेखमालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, यासाठी मी तुमच्याप्रती कृतज्ञ आहे.

१. लेखमालिकेविषयी वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया

१ अ. लेखनासाठी सुचवलेले विषय, तसेच लेखन परिपूर्ण होण्यासाठी सुचवलेल्या सुधारणा !

अ. काही वेळा मोघम माहिती दिली जाते. तशी न देता नेमक्या शब्दांत माहिती द्यावी.
आ. प्रत्येक ऋतुनुसार कसे आचरण करावे ? याविषयीही माहिती द्यावी.
इ. कोरोनाच्या काळात आम्ही काही आयुर्वेदाची औषधे घेऊन ठेवली आहेत. त्यांचा उपयोग कसा करावा ? याविषयी माहिती द्यावी.
ई. बैठे काम करणार्‍यांनी दिवसातून ४ – ४ वेळा खाणे योग्य आहे का ? योग्य काय असायला हवे, ते कळवा.
उ. आम्हाला चहा सोडायचा आहे; परंतु सकाळी काहीतरी गरम प्यावेसे वाटते. यावर काय करावे ? ते कळवा.
ऊ. विकतच्या फराळामध्ये कृत्रिम संरक्षक (प्रिझर्वेटिव्हज) असतात. त्यामुळे दिवाळीचा फराळ घरीच बनवण्याविषयी प्रबोधन व्हावे.
ए. मला २ वेळाच आहार घेणे जमते; परंतु घरचे मला अधिक वेळा खाण्याचा आग्रह करतात. यासंबंधी काहीतरी लिहा.
ऐ. काही कारण नसतांना थकवा येतो. गळून गेल्यासारखे होते. यावर उपाययोजना सांगा.
ओ. झोप अर्धवट झाल्याने काय दुष्परिणाम होतात, ते कळवा.
औ. विवाहसोहळ्याच्या वेळी ठेवले जाणारे अन्नपदार्थ आयुर्वेदानुसार योग्य नसतात. याविषयी लेखन करा.

तुम्ही सुचवलेल्या सुधारणा करण्याचा प्रयत्न होत आहे. वर दिलेल्या काही विषयांसंबंधी लेखन प्रसिद्ध झाले आहे, तर काही विषयांसंबधी लेखन चालू आहे.

वैद्य मेघराज पराडकर

१ आ. लेखमालिकेचे कौतुक करून लेखनासाठी दिलेली प्रेरणा !

अ. आम्ही प्रतिदिन लेखमालिका वाचतो. एखाद्या दिवशी लेख आला नाही, तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते.
आ. लहान लहान चौकटी नेमक्या शब्दांत असल्याने वाचाव्याशा वाटतात. उद्या काय येणार ? याविषयी उत्सुकता रहाते.
इ. आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे यात मिळतात.
ई. आम्हाला लेख पुष्कळ आवडतात. आम्ही प्रतिदिन आमच्या व्हॉट्सॲपच्या ‘स्टेट्स’वर आणि फेसबुक पानावर हे लेख ठेवतो, तसेच अन्य सामाजिक माध्यमांतूनही या लेखांचा प्रसार करतो.
उ. सामाजिक माध्यमांमध्ये पुष्कळ माहिती असते; परंतु ती शास्त्रानुसार योग्य आहे कि नाही ? हे आमच्या लक्षात येत नाही. ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या स्तंभातील माहिती शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत असल्याने बुद्धीला पटते. बुद्धीला पटल्याने आचरण करण्याची इच्छा निर्माण होते. आचरण केल्यावर अनुभव येतात आणि त्याने पुनःपुन्हा आचरण करण्याची प्रेरणा मिळते.

२. लेखकाच्या लेखमालिकेतील सातत्याचे एकमेव कारण : वाचकांची कृतीशीलता

अ. आम्ही चहा सोडला.
आ. सकाळचा, तसेच सायंकाळचा अल्पाहार बंद करून केवळ २ वेळा जेवण्याची सवय लावली.
इ. आरंभीचे काही दिवस चहा किंवा अल्पाहार बंद करतांना डोके दुखणे, मळमळणे इत्यादी त्रास झाले; परंतु काही दिवसांनी आपोआप सवय झाली. आता पुष्कळ चांगले वाटत आहे.
ई. आम्हाला सकाळी उठून तांब्याभर पाणी पिण्याची सवय होती. ते चुकीचे आहे, हे लक्षात आल्यावर आम्ही तसे पाणी पिणे बंद केले.
उ. नियमित व्यायाम, तसेच उन्हाचे उपाय होऊ लागले.
ऊ. ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेत दिल्यानुसार आचरण केल्याने उत्साहात वाढ झाली.
ए. ८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहणाचे वेध सूर्याेदयापासून पाळले. २४ घंट्यांचा उपवास केला. आपण एवढा वेळ विनाअन्न राहू शकतो, यावर विश्वासच बसत नव्हता. प्रत्यक्षात कृती केल्यावर लक्षात आले.

तुमच्या कृतीशीलतेमुळेच आतापर्यंत लेखनात सातत्य राहिले आहे. हा तर केवळ आरंभ आहे. अजून पुष्कळ प्रवास बाकी आहे. पुढील प्रवासामध्येही वाचकांचे असेच भरभरून प्रेम मिळावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

३. लेखमालिका म्हणजे आयुर्वेदाच्या प्रसारातील खारीचा वाटा !

‘भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असेल’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे एक सुवचन आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने आयुर्वेद पुन्हा वैभव प्राप्त करणारच आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता येत आहे आणि त्यामुळे वाचकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, याचा आनंद खरोखर अवर्णनीय आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यातील चैतन्यामुळे आयुर्वेदानुसार आचरण होत असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एकदा सांगितले होते, ‘‘केवळ लेखन उपयोगाचे नाही, तर स्वतः तसे आचरण करणे आवश्यक आहे. स्वतःचे आचरण असेल, तर लेखनात चैतन्य येते आणि चैतन्यामुळे जे कार्य होते, ते दीर्घकाळ टिकते’’.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यातील चैतन्यच माझ्याकडून आणि साधकांकडून आयुर्वेदाचे आचरण करवून घेत आहे’, अशी माझी श्रद्धा आहे.

५. लेखमालिकेनुसार आचरण करून आलेले अनुभव कळवावेत !

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेनुसार आचरण करून तुम्हाला आलेले अनुभव वर दिलेल्या संपर्क पत्त्यावर कळवावेत. तुम्हाला काही वेगळे विषय सुचवायचे असल्यासही अवश्य सुचवावेत. काही चुकीचे वाटल्यास तेही कळवावे. याचा लेखमालिका अजून चांगली होण्यासाठी लाभ होईल. तुमच्या प्रत्येकाच्या ई-मेलला मी उत्तर देऊ शकेन, असे नसले, तरी तुम्ही पाठवलेला प्रत्येक ई-मेल मी निश्चित वाचीन. तुमच्यातील काहींचे अनुभव ‘सनातन प्रभात’मध्ये छापता येतील. यामुळे इतरांनाही शिकायला मिळेल. ‘ज्योतसे ज्योत जगावो’, या उक्तीप्रमाणे एकाचे पाहून दुसरा आचरण करू लागेल आणि यातून पूर्ण समाज निरोगी होण्यास साहाय्य होईल.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२२)


संपर्कासाठी पत्ता

वैद्य मेघराज पराडकर
पत्ता : २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१
ई- मेल : [email protected]

________________________________