पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

आफताबने श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण !

मुंबई – श्रद्धा वालकर हिने पोलिसांत केलेली तक्रार मी पाहिली आहे. ही तक्रार अतिशय गंभीर आहे. त्या तक्रारीवर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. वर्ष २०२० मध्ये श्रद्धा वालकर हिने आफताब मारहाण करत असल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात केली होती; मात्र पोलिसांनी त्यावर ठोस कारवाई केलेली नाही.

याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मी कुणावरही आरोप करणार नाही; पण अशा  प्रकारच्या तक्रारींवर कारवाई झाली नाही, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या तक्रारीची निश्चितच पडताळणी केली जाईल. त्या तक्रारीवर कारवाई झाली असती, तर कदाचित् श्रद्धाचा जीव वाचला असता.’’ श्रद्धा हिने पोलिसांत केलेल्या तक्रारीमध्ये “आफताबने मला अनेकदा मारहाण केली आहे. मागील ६ मासांपासून तो मला मारहाण करत आहे. आज त्याने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मला भीती वाटत आहे की, तो मला जिवे मारून माझे तुकडे करेल आणि फेकून देईल. मला जर काही झाले, तर त्यासाठी आफताब कारणीभूत असेल.’’ आफताब सध्या पोलीस कोठडीत असून त्याची ‘नार्को’ चाचणी  करण्यासाठी न्यायालयाने अनुमती दिली आहे.