इंदापूर (पुणे) येथील ७ अनधिकृत पशूवधगृहे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी पाडली !

प्रतिकात्मक छायाचित्र

इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील अवैध पशूवधगृहांवर २३ नोव्हेंबर या दिवशी प्रशासनाने धडक कारवाई करत जनावरांच्या कत्तलीसाठी बांधलेली ७ बांधकामे पाडली आहेत. इंदापूर येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गोरक्षक श्री. हृषीकेश कामथे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दिले होते. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी या प्रकाराची गंभीर नोंद घेतली. नगरपरिषद आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अनुमाने ८० ते १०० पोलिसांच्या फौजफाट्यासह पशूवधगृहावर सकाळी १० वाजल्यापासून धडक कारवाई केली आहे. यामुळे गोवंशियांची तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. अनेक धर्मांधांनी शहरात पत्रा शेड उभारून त्यामध्ये अवैध पशूवधगृहे चालू केली होती. ही सर्व बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने पाडून साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गोरक्षा दल आणि महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक यांच्या संघटित प्रयत्नांना यश !

गोरक्षा दल, महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आणि विशेषतः गोरक्षक श्री. अक्षय कांचन आणि सहकारी यांनी वेळोवेळी इंदापूर येथील स्थानिक नेते, जिल्हापरिषद सदस्य, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पालकमंत्री अन् जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी संपर्क साधला. निवेदनाच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करून इंदापूर येथील पशूवधगृहे बंद करण्यासाठी आणि वाढती गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. ही कारवाई म्हणजेच गोरक्षा दल आणि महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक यांच्या संघटित प्रयत्नांना मिळालेले यश आहे.

या वेळी गोरक्षक हृषीकेश कामथे यांनी सांगितले की, ही पशूवधगृहे पाडली असली, तरी गोहत्या पुढे थांबणार नाहीत; कारण कसायांनी नवीन जागा बघून ठेवली आहे, तसेच गोरक्षकांचेही गोमातेला वाचवण्याचे प्रयत्न सातत्याने चालू रहातील.