पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १० धार्मिक संस्थांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस !

पुणे रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील अनधिकृत दर्गा

पुणे – प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पुणे रेल्वे विभागाने १० धार्मिक संस्थांना १५ दिवसांच्या आत पुणे रेल्वे स्थानक आणि आसपासच्या रेल्वेच्या भूमीवर अवैधपणे बांधलेल्या धार्मिक वास्तू हटवण्याची नोटीस बजावली आहे, असे न झाल्यास रेल्वे प्रशासन स्वतः ही अतिक्रमणे हटवेल. यामध्ये मशीद, दर्गा, मंदिरे आणि बुद्ध विहार यांचा समावेश आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारासमोरील एक दर्गा आणि सूर्यमुखी दत्त मंदिर, आर्.पी.एफ्. पोलीस ठाण्याच्या पुढे साईबाबा मंदिर, तसेच रेल्वेच्या पोर्टर चाळ परिसरातील दत्त मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर अन् जवळील एक बुद्ध विहार आदी धार्मिक ठिकाणे आहेत.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण

पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झंवर यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी वापरल्या जाणार्‍या परिसरात असलेल्या मोकळ्या जागा अतिक्रमण करणार्‍यांकडून परत घेण्याचा रेल्वेला पूर्ण अधिकार आहे.

रेल्वेने नोटिसा बजावलेल्या धार्मिक वास्तूंपैकी एका वास्तूच्या विश्वस्तांनी सांगितले की, रेल्वे आम्हाला आमच्या धार्मिक वास्तू हटवण्यास सांगू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे आहोत आणि आम्हाला दूर जा, असे सांगणे योग्य नाही. आम्ही लवकरच बैठक घेऊन रेल्वेने दिलेल्या नोटिसीला कायदेशीर उत्तर देणार आहोत.


Download