‘परिस्थितीला सामोरे कसे जायचे ?’, याविषयी अमूल्य मार्गदर्शन करून प्रत्येक क्षणी साधकांना फुलासारखे जपणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून आपत्काळाच्या दृष्टीने साधकांची मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील सिद्धता करून घेण्यात येते. त्या अनुषंगाने माझी झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘वाईट शक्तींचा सामना कसा करायचा ?’, याविषयी परात्पर गुरुदेवांनी अमूल्य मार्गदर्शन करणे आणि त्यातून शिकून सहस्रो साधक वाईट शक्तींशी सूक्ष्मातून अविरत लढा देत असणे

सनातन संस्था करत असलेल्या चांगल्या कार्याला विरोध करण्यासाठी अनुमाने वर्ष २००१ पासून वाईट शक्तींनी सनातनच्या साधकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यास आरंभ केला. सनातनच्या साधकांना ‘वाईट शक्तींचे विश्व’ नवीनच होते. परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांना ‘वाईट शक्तींशी कसे लढावे ? नामजपादी उपाय कसे करावेत ?’, हे शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले, तसेच त्याविषयी वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शनही केले. त्यांच्या कृपेमुळेच सनातनचे सहस्रो साधक वाईट शक्तींना न घाबरता आजही त्यांच्याशी सूक्ष्मातून अविरत लढा देत आहेत. सनातनचे वाचक, तसेच हितचिंतकही आता त्यांना होत असणार्‍या विविध त्रासांवर नामजपादी उपाय करत आहेत.

२. सनातन संस्थेवर येऊ घातलेल्या संभाव्य बंदीच्या संकटात गुरुदेवांनी साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करून घेणे अन् साधक संभाव्य बंदीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी चांगल्या प्रकारे सिद्ध होणे

सौ. नम्रता दिवेकर

वर्ष २००९ मध्ये सनातन संस्थेवर संभाव्य बंदीचे संकट आले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रकारे मार्गदर्शन करून बंदीच्या दृष्टीने साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करून घेतली होती. प्रारंभीच्या काळात साधकांना थोडी भीती किंवा ताण जाणवत होता; पण नंतर गुरुदेवांच्या कृपेमुळेच साधक संभाव्य बंदीच्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्यास चांगल्या प्रकारे सिद्ध झाले होते.

३. भाववृद्धी सत्संगांत केल्या जाणार्‍या मार्गदर्शनातून गुरुदेवांनीच साधकांची आपत्काळाचा सामना करण्यासाठी सिद्धता करून घेणे

आता तर आपल्याला आपत्काळाचा सामना करायचा आहे; पण त्याही परिस्थितीत ‘माझ्या साधकांना त्रास होऊ नये’, असा विचार करून साधकांना तारणारी गुरुमाऊली आपल्याला लाभली आहे. ‘कोणतेही संकट कितीही मोठ्या स्वरूपात आले, तरी सिद्धतेच्या दृष्टीने साधकांनी काय काळजी घ्यायची ? देवाचे साहाय्य कसे घ्यायचे ? श्रद्धेच्या जोरावर भीषण आपत्काळाचा सामना कसा करायचा, तसेच पंचमहाभूतांच्या माध्यमातून येणार्‍या संकटांना सामोरे कसे जायचे’, या दृष्टीने ‘गुरुदेवच या भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून साधकांना अनमोल मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवते. भाववृद्धी सत्संग ऐकतांना साधकांचे मनोबल वाढते. साधकांना वाटणारी काळजी, भीती आणि ताणही न्यून होतो, याचा अनुभव अनेक साधकांनी घेतला आहे.

४. कृतज्ञता !

आतापर्यंत अनेक संकटांचा सामना करत परात्पर गुरुदेवांनी सनातनच्या साधकांना प्रत्येक वेळी बळ देऊन जीवनदान दिले आहे. आपत्काळातही केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच साधकांचे रक्षण होणारच आहे. प्रत्येक क्षणी साधकांना फुलासारखे जपणार्‍या आणि वीरवृत्तीने सामना करायला शिकवणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक