महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस

बेळगाव, कारवार, निपाणीसह इतरही गावे महाराष्ट्रात घेण्याचे सूतोवाच !

डावीकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

नागपूर – महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, याउलट सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी यांसह तिकडे असलेली गावे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याचा ठराव आता केलेला नसून तो वर्ष २०१२ मध्येच केला आहे. सरकारने त्या गावांना म्हैशाळ येथील सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘जत तालुका हा दुष्काळी भाग आहे. तेथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तेथील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव संमत केला होता. ‘या ठरावावर कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे’, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.