पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शनाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या भावपूर्ण प्रार्थना आणि शरणागत स्थितीत व्यक्त केलेली कृतज्ञता !

 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पू. रमानंदअण्णांनी मार्गदर्शन करतांना ‘साधनेत पुढे जाण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी साधकांना चिंतन करण्यास सांगून ध्येय ठेवून प्रयत्न करण्यास सांगणे

पू. रमानंद गौडा

‘२७.८.२०२० या दिवशी कर्नाटक राज्यातील साधकांसाठी सनातनचे संत पू. रमानंद गौडा (पू. रमानंदअण्णा) यांचे मार्गदर्शन होते. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेल्या साधकांपैकी काहींची पातळी न्यून झाली, काही जणांची आध्यात्मिक पातळी तितकीच राहिली, तर काही साधकांची आध्यात्मिक पातळी वाढली. अशा सर्व साधकांसाठी हे मार्गदर्शन होते. सत्संगात साधकांनी ‘कोणत्या स्वभावदोषांमुळे आपण साधनेत मागे राहिलो ?’, याविषयी चिंतन सांगितले.

त्यानंतर पू. रमानंदअण्णांनी ‘साधनेत पुढे जाण्यासाठी कसा दृष्टीकोन ठेवायला हवा ? कसे प्रयत्न करायला हवेत ? आपला शिष्यभाव कसा असायला हवा ? कोणत्या गुणांच्या अभावाने आपण न्यून पडलो ?’, याचे चिंतन करण्यास सांगितले.  स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी दिवाळीपर्यंतचे ध्येय ठेवून त्यांनी प्रयत्न करण्यास सांगितले.

२. मार्गदर्शनाच्या शेवटी पू. रमानंदअण्णांनी शरणागतभावाने प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केल्यावर साधकांची भावजागृती होऊन वातावरणात पालट होणे

मार्गदर्शनाच्या शेवटी पू. रमानंदअण्णांनी कृतज्ञता आणि शरणागत भावाने प्रार्थना केली. या प्रार्थना त्यांना आतून सुचल्या होत्या. त्या ऐकून सर्व साधकांची भावजागृती झाली आणि त्यांनी वेगळीच अवस्था अनुभवली. ‘हे सर्व आपण आपल्या जीवनात अनुभवले आहे’, असे बर्‍याच साधकांना वाटले. या प्रार्थना ऐकतांना वातावरणातही पालट झाला होता.

३. पू. रमानंदअण्णा यांनी भावपूर्ण शब्दांत केलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे वर्णन आणि त्यांना केलेल्या प्रार्थना !

३ अ. जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकलेल्या जिवाकडून साधना करून घेणारे ‘मोक्षगुरु परात्पर गुरु डॉक्टर’ ! : ‘हे दयासागर, हे कृपासिंधु गुरुदेवा, हा जीव कलियुगातील घोर अंधकाराच्या भोवर्‍यात अडकून पडला होता. अनेक जन्मांत केलेल्या कर्मांमुळे ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ म्हणजे ‘पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू’ या चक्रांत अडकलेल्या या अनाथाला पुढील दिशा मिळत नव्हती. या जन्मात तुम्ही माझा हात धरला. अनेक जन्मांत केलेल्या माझ्या पापांचे क्षालन करून तुम्ही मला गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचा मार्ग दाखवला आणि या जिवाला आश्रय दिला. तुमच्या अपार कृपेनेच मला या जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त केले आहे. आमच्या जिवाचा उद्धार करणारे तुम्हीच आहात.

३ आ. साधकांना घोर प्रारब्ध आणि अडचणी यांतून बाहेर काढणारे आणि ‘जीवनदान देणारे परात्पर गुरु डॉक्टर’ ! : तुम्ही माझ्या जीवनात आल्यानंतर माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध, म्हणजे शारीरिक त्रास (देहप्रारब्ध), मानसिक त्रास (मनोप्रारब्ध), अनेक प्रकारच्या कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी (देवाण-घेवाण हिशोब), तसेच आध्यात्मिक त्रास न्यून झाले आहेत. एवढेच नव्हे, तर कितीतरी वेळा या शरिरातून प्राण जाण्याचे, म्हणजे मृत्यूचे प्रसंग आले असतील, तर अशा स्थितीत तुम्हीच मला जीवनदान दिले आहे. घोर प्रारब्धात अडकलेल्या या जिवाला तुम्हीच मुक्त केले. मी काहीच करू शकत नाही गुरुदेवा. तुम्हीच सर्व केले. तुम्ही केलेल्या या कृपेसाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे गुरुदेवा !

३ इ. साधकांतील दुर्गुण नष्ट करून साधनेचा संस्कार करणारे ‘साधनागुरु परात्पर गुरु डॉक्टर’ ! : माझ्यात माया, मोह, क्रोध, लोभ आणि वासना हे दुर्गुण सर्व पुरेपूर भरलेले असून ते न्यून करण्याची माझ्यात तीळमात्र शक्ती नाही. हे सर्व केवळ तुम्हीच आपल्या दिव्य दृष्टीने न्यून करत आहात. माझे मन आणि बुद्धी यांमध्ये असलेले जन्मजन्मांतरीचे वाईट संस्कारही तुम्हीच काढून टाकत आहात. इतकेच नाही, तर माझे अंतर्मन शुद्ध करून तुम्ही तेथे साधनेचा संस्कार केला आहे.

३ ई. साधक-जिवांवर अपार कृपा करणारे ‘कृपासिंधु परात्पर गुरु डॉक्टर’ ! : तुम्ही आमच्यावर केलेल्या अपार प्रीतीचे गुणगान आणि तुमच्या कृपेचे वर्णन मी कसे करू ? मी आतापर्यंत कितीतरी वेळा ही अपार प्रीती आणि कृपा यांचा अनुभव घेतला आहे. मी आणखी कितीही जन्म घेतले, तरी तुमच्या ऋणांतून मुक्त होणे शक्य नाही, गुरुदेवा !

३ उ. साधकांना ज्ञान देणारे ‘ज्ञानगुरु परात्पर गुरु डॉक्टर’ ! : साधकांना तुम्ही असे ज्ञान दिले आहे की, जे सर्वसामान्यांना समजणार नाही आणि ग्रहणही करता येणार नाही. तुम्ही इतके कृपाळू आहात की, माझे मन आणि बुद्धी यांवरील आवरण दूर करून तुम्ही माझ्यात ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण केली आहे. तुमच्या या कृपेसाठी माझे संपूर्ण जीवन मी साधनेसाठी समर्पित करत आहे.

३ ऊ. साधकांना ‘संत’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ पदापर्यंत घेऊन जाणारे ‘सर्वशक्तीमान परात्पर गुरु डॉक्टर’ ! : जीवन्मुक्त किंवा बंधनांतून मुक्त होण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या या मोक्षमार्गावर अनेक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, तर काही संत आणि सद्गुरु झाले आहेत. काही परात्पर गुरुपदीसुद्धा पोचले आहेत. या श्रेष्ठ पदाला पोचणे, हे सच्चिदानंदस्वरूप सर्वशक्तीमान अशा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच साध्य झाले. ‘या मार्गावर तुम्ही आम्हाला पुढे पुढे घेऊन जावे’, अशी तुमच्या चरणी समर्पणभावाने विनवणी आहे !

मी जर तुम्हाला धरले असते, तर माझा हात कधीच निसटला असता; परंतु आज तुम्ही माझा हात धरला असल्याने मला जिवंत राहून साधना करणे शक्य होत आहे गुरुदेवा !

३ ए. हिंदु राष्ट्र्र स्थापनेचा उद्घोष करून त्या महान कार्यात साधकांना सामावून घेणारे ‘हिंदु राष्ट्र्राचे प्रणेते परात्पर गुरु डॉक्टर’ ! : आज माझे आई-वडील, कुटुंबीय, भावंडे आदी कुणीच माझ्यावर लक्ष ठेवू शकत नाहीत. तुम्ही एकटेच माझ्यावर लक्ष ठेवत आहात ! या जिवाला केवळ तुमचाच आधार आहे. तुमच्या कृपाकटाक्षामुळे मला माझे मन, बुद्धी आणि अहं यासंदर्भात घडणार्‍या प्रसंगांत संघर्ष करून लढण्याची शक्ती मिळाली. हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या महान कार्यात तुम्ही मला सामावून घेतले, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेवा, आता माझ्या अंतर्मनात केवळ तुमचे अखंड स्मरण चालू राहू दे. मी कितीही जन्म घेतले, तरी तुमचे ऋण फेडणे मला शक्य नाही गुरुदेवा !

३ ऐ. साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे ‘दयासागर परात्पर गुरु डॉक्टर’ ! : गुरुदेवा, तुमच्याकडे मागण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, मी मागायच्या आधीच तुम्ही मला सर्वकाही दिले आहे. हे गुरुदेवा, मला या भवबंधनातून मुक्त करणारे अन्य कुणीच नाही. ‘तुमच्या चरणकमली आसरा मिळेल’, अशी इच्छा मनी धरून मी आलो आहे. माझ्यावर दया करणारे तुम्ही एकटेच आहात. श्रीहरि, माझे हृदय तुमच्यासाठी व्याकुळ झाले आहे. आता माझे एकच ध्येय उरले आहे, ते म्हणजे तुमच्या चरणी विलीन व्हायचे !

‘गुरुदेवा, ‘माझ्यात तीव्र तळमळ, अखंड भावावस्था आणि दृढ श्रद्धा तुम्हीच निर्माण करा. ‘इतर काहीही सोडीन; पण प्राण गेला, तरी आपले चरण सोडायचे नाहीत’, अशी दृढ श्रद्धा माझ्यात निर्माण करा ! माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हाच ध्यास माझ्या हृदयात राहू दे. ‘या देहातून प्राण बाहेर पडण्याआधी तुमच्या चरणांची धूळ बनवून मला समर्पित करून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– (पू.) रमानंद गौडा, मंगळुरू, कर्नाटक. (२७.८.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक