देहलीमध्ये ‘आप’च्या आमदाराला मारहाण !

पालिका निवडणुकीच्या उमेदवारीचे तिकीट विकल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा दावा

देहली – येथील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार गुलाबसिंह यादव यांना २१ नोव्हेंबरच्या रात्री काही लोकांनी धक्काबुकी करत कॉलर पकडून मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामध्ये गुलाबसिंह स्वत:ला वाचवण्यासाठी धावत असतांना काही लोक त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. गुलाबसिंह येथील श्याम विहारमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेत होते. त्यावेळी ही घटना घडली. ‘ही घटना कोणत्या कारणामुळे घडली’, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही; मात्र पालिका निवडणुकीसाठी उमेदवारीचे तिकीट विकल्याच्या आरोपावरून आपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

या आरोपावर गुलाबसिंह यांनी ट्वीट करत म्हटले की, भाजप बिनबुडाचा आरोप करत आहे. मी आता छावला पोलीस ठाण्यात आहे. या प्रभागातील भाजपचे नगरसेवक आणि भाजपचे उमेदवार आक्रमणकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे मी पाहिले आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो ? प्रसारमाध्यमे येथे उपस्थित आहेत, त्यांनी भाजपला विचारले पाहिजे.