राष्ट्रवाद जोपासण्यासाठी क्रांतीकारकांचे स्मरण आवश्यक ! – माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी

अधिवक्ता विलास पाटणे यांच्या ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

रत्नागिरी – संस्थाने खालसा होतांना मानधन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते; पण राणीने प्रतिकूल परिस्थितीत जिवावर बेतून प्रतिकार केला तो केवळ राष्ट्रवादासाठी ! देशभक्ती जागवण्याकरता त्यांनी बलीदान दिले, ते केवळ स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे स्फुलिंंग यामुळेच ! राष्ट्रभक्ती शिकवण्याची आज वेळ आली आहे. राष्ट्रवादाचे उदाहरण द्यायचे असेल, तर स्वातंत्र्यासाठी बलीदान देणार्‍या क्रांतीकारकांचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त आणि माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले. येथील मराठा भवनात २० नोव्हेंबर या दिवशी अधिवक्ता विलास पाटणे यांच्या ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. राणी लक्ष्मीबाईंच्या नेवाळकर घराण्यातील राजू नेवाळकर आणि मुखपृष्ठ साकारणारे गौरव पिळणकर यांचा या वेळी पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे यांनी केले.

‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ पुस्तकाचे प्रकाशन करतांना मान्यवर

माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी पुढे म्हणाले, ‘‘मराठी पुस्तके अस्तंगताच्या मार्गावर आहेत. घरटी प्रति मास एक तरी मराठी पुस्तक खरेदी करून वाचावे. मराठीला बोलण्यात दुय्यम स्थान दिले जात आहे, हे चुकीचे आहे. मराठी पुस्तकांचे रसग्रहण झाले, तरच चोखंदळ वाचकांची चळवळ चालू राहील. आपण उपाहारगृहातील जेवण कसे होते ? यावर चर्चा करतो, मग वाचलेल्या पुस्तकावर चर्चा का करत नाही ?’’

‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकणात भक्तीभाव आणि लोककला आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी झाशी संस्थानात या कलांना प्रोत्साहन दिले. धर्माच्या माध्यमातून संस्कारित पिढी घडवता येईल, हे राणीने ओळखले होते. हा कोकणच्या संस्कारांचाच भाग होता.

लेखक अधिवक्ता विलास पाटणे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईंची महती सांगितली आणि हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली ? हे स्पष्ट केले.

शौर्य चक्रविजेते कमांडो पथकाचे प्रमुख मधुसूदन सुर्वे यांनी ‘ऑपरेशन हिफाजत’, इंफाळ (मणीपूर) याची माहिती सांगितली. या ‘ऑपरेशन’मध्ये त्यांच्या पायात आणि पोटात ११ गोळ्या घुसल्या होत्या. प्रतिकूल स्थिती, प्रचंड पाऊस आणि ढगाळ वातावरणात हे ऑपरेशन यशस्वी केले. आपला गौरवशाली इतिहास सांगितला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सैनिकांचा इतिहास मुलांना पाठ्यपुस्तकातून अभ्यासायला द्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हाईस अ‍ॅडमिरल अभय कर्वे यांनी सांगितले की, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य सर्वांना ठाऊक आहे; पण अधिवक्ता पाटणे यांनी सर्व इत्थंभूत माहिती देऊन पुस्तक सजवले आहे. भारतीय सेनेची तिन्ही दले प्रत्येक क्षणी भारतियांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहेत. देशसेवा बजावतांना सैनिक घरी परत येतील की नाही, याची शाश्‍वती नसते. या सार्‍यातून त्यांच्या कुटुंबियांनाही जावे लागते.

 (सौजन्य : Kokan Media Ratnagiri)

गायिका ईशानी पाटणकर यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्‍वनाथ बापट यांनी आभार मानले.