विवाहाविषयीच्या विचारांवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि श्रीगुरूंनी सुचवलेले दृष्टीकोन !

‘अनुमाने वर्ष २००९ मध्ये माझ्या मनात स्वतःच्या विवाहाविषयी विचार येत होते. तेव्हा ‘हा निर्णय स्वतः न घेता अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीला विचारून घ्यावा’, असे मला वाटले. मी मनाचा निश्चय करून अध्यात्मातील उन्नतांना माझ्या मनातील लग्नाचे विचार सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘साधनेकडे लक्ष दे. त्यातच कल्याण आहे.’’ त्यांच्या आज्ञेने मी माझ्या विवाहाच्या विचारांपासून दूर राहून साधनेवर लक्ष केंद्रित केले, तरीसुद्धा माझ्या मनात कधीतरी विवाहाविषयी विचार यायचे आणि गुरुकृपेने मला त्यांवर मात करता आली. या संदर्भात मला आलेल्या काही अनुभूती मी श्रीगुरुचरणी अर्पण करत आहे.

श्री. निरंजन चोडणकर

१. रुग्णाईत असतांना ‘आपल्या हक्काचे कुणीतरी जवळ असावे’, असा विचार आल्यावर ‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि तोच माझी काळजी घेत आहे’, या विचाराने मात करता येणे

मी अधून-मधून रुग्णाईत झाल्यावर माझ्या मनामध्ये ‘अशा वेळी आपल्या हक्काचे कुणीतरी जवळ असते, तर बरे झाले असते’, असा विचार यायचा. तेव्हा ‘श्रीकृष्ण माझा खरा सोबती आहे आणि खर्‍या अर्थाने तोच माझी काळजी घेत आहे. सर्व सहसाधकांच्या माध्यमातून तोच मला ‘हवे-नको’ ते सर्व पहात आहे. त्यामुळे मला अन्य कुणाची आवश्यकता नाही’, या विचाराने मला लग्नाच्या विचारावर मात केली.

२. ‘मागील अनेक जन्मांमध्ये विवाह केले असल्यामुळे हा जन्म केवळ हिंदु राष्ट्रासाठी समर्पित करूया, तसेच ‘जीवनात गुरु हेच माझे विश्व आहे’, असे मनाला सांगून विवाहाच्या विचारांमधून बाहेर पडता येणे

माझे मित्र, नातेवाईक, काकांची मुले अशा अनेकांचे विवाह ठरल्यावर मी शक्यतो त्यांच्या विवाहाला जाणे टाळायचो; कारण ‘मी विवाहाला गेलो आणि माझ्या मनात विवाह करण्यासंदर्भात विचार आले अन् मी त्या विचारांना बळी पडलो तर’, असे मला वाटायचे. त्या वेळी माझ्या मनात विवाहाचे विचार आल्यावर मी घाबरून न जाता शांत रहायचो. ‘मागील अनेक जन्मांमध्ये मी विवाह केले असतील. तेव्हा हा जन्म केवळ हिंदु राष्ट्रासाठी समर्पित करूया, तसेच या जन्मातच मला हे गुरु लाभले आहेत, ते पुढे कधी भेटतील ते ठाऊक नाही. त्यामुळे आता ‘जीवनात गुरु हेच माझे विश्व आहे’, असे मनाला सांगूया’, असा मी विचार करायचो. अशा प्रकारे देव मला त्या विवाहाच्या विचारांमधून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करायचा.

३. घरातील व्यक्ती आणि नातेवाईक यांनी विवाहाच्या संदर्भात विचारल्यावर ‘साधनेकडे लक्ष दे !’ या अध्यात्मातील उन्नतांच्या वाक्याने बळ मिळणे 

माझ्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईक अनेक वेळा मला विवाहाच्या संदर्भात विचारायचे. त्या वेळी ‘हा विषय सोडून तुम्ही मला अन्य काही सांगा, मी ऐकीन; पण विवाहासंदर्भात मी तुमचे काही ऐकणार नाही’, असे मी त्यांना ठामपणे सांगायचो. माझ्या या मतावर मी ठाम रहायचो; कारण ‘साधनेकडे लक्ष दे !’ या अध्यात्मातील उन्नतांच्या वाक्याने मला बळ मिळायचे.

४. ‘जीवनात विवाह म्हणजे सर्वकाही आहे’ या विचारावर घेतलेला दृष्टीकोन 

‘जीवनात विवाह म्हणजे सर्वकाही आहे’, असे मला वाटले, तर मी माझ्या मनावर ‘श्रीगुरु हेच सर्वस्व आहेत’ हे सतत बिंबवत होतो. ‘माझ्या जीवनातील माझा सर्वांत मोठा आधार परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत. मला मायेतील अन्य कुणाचाच आधार नको’, असे मनाला समजावले की, माझे मन शांत व्हायचे.

५. सहकार्यकर्त्यांशी विवाहाच्या संदर्भात बोलत असतांना नकळतच ‘विवाह’ या विषयाचे रूपांतर ‘गुरुदेवांचा महिमा’ वर्णन करण्यात होणे 

मी सहकार्यकर्त्यांशी विवाहाविषयी बोलत असतांना ‘विवाह’ या विषयाचे रूपांतर गुरुदेवांचा महिमा वर्णन करण्यात कधी व्हायचे, ते मलाच कळायचे नाही. ‘देवच माझ्या मनाचा निर्धार होण्यासाठी हे सर्व करून घेत आहे’, हे मला कळतच नव्हते. या सर्व विचार प्रक्रियेत परात्पर गुरु डॉक्टर यांनी माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली आणि ‘माझा श्वास परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला.

६. सहकार्यकर्त्यांनी विवाहाविषयी विचारणा केल्यावर त्यांना देवाने सुचवलेले विविध दृष्टीकोन सांगत असतांना स्वतःच्या मनाची शुद्धी होणे, त्यामुळे हळूहळू या विचारांची तीव्रता पुष्कळ अल्प होणे 

काही वेळा सहकार्यकर्ते माझ्याकडे विवाहाविषयी बोलायचे. त्या वेळी काही क्षण माझ्याही मनात विवाहाचे विचार यायचे. त्यांनी त्यांच्या विवाहाविषयी माझ्याकडे विचारणा केल्यावर मी त्यांना ‘आताच्या स्थितीत साधनेचे महत्त्व काय आहे ? काळ कसा आहे ? सध्याच्या स्थितीत साधनेला महत्त्व दिले, तर आध्यात्मिक उन्नती कशी होईल ?’ याविषयी सांगण्याचा प्रयत्न करायचो. त्यांना या विचारावर मात करण्यासाठी ‘स्वयंसूचना घेणे, भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे आणि भावाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करणे’, असे प्रयत्न करायला सांगायचो. हे सर्व परात्पर गुरुदेवच माझ्याकडून करवून घेत होते. हे सांगत असतांना माझ्या मनाचीही शुद्धी होऊन त्याचा मला लाभ झाला. आता माझ्या मनात विचार आले, तरी त्याची तीव्रता पुष्कळ अल्प असते. माझ्या मनात विचार येतात आणि जातात.

७. इतरांचे विवाह ठरल्याचे कळल्यावर मन विचलित झाले असता ‘निरंजन आणि परात्पर गुरुदेव’ यांच्यामध्ये कुणीच नाही, असा दृष्टीकोन दिल्यावर मन शांत होऊन आनंद मिळणे

काही वेळा इतरांचे विवाह ठरल्याचे माझ्या कानावर यायचे किंवा त्या वेळी मनात विवाहाचे विचार आल्यावर आपले नाते ‘निरंजन आणि परात्पर गुरुदेव’, असेच आहे अन् तेच अधिक योग्य आहे. माझ्या आणि परात्पर गुरुदेवांच्या मध्ये कुणी आलेले मी सहन करू शकत नाही’, असा दृष्टीकोन मनाला द्यायचो. तेव्हा माझे मन शांत होऊन मला आनंद मिळायचा.

८. आपत्काळात ‘समर्पितभावाने श्रीगुरुचरणी झोकून देणे’ हीच गुरुदक्षिणा !

सध्या आपत्काळ चालू आहे. ‘समर्पितभावाने श्रीगुरुचरणी झोकून देणे’, हेच आपण गुरुदेवांना गुरुदक्षिणा अर्पण केल्यासारखे होईल. या आपत्काळात स्वतःचा सांभाळ करणेही कठीण आहे. अशा कालावधीत ‘आपले गुरु जे आपल्याला सांगतील, त्याचे पालन करणे’, हेच आपले यापुढे जीवन असायला हवे.

हे सर्व श्रीगुरूंनी माझ्याकडून करवून घेतले आणि त्यांनीच हे विचार माझ्याकडून लिहून घेतले, यासाठी श्रीगुरुचरणी कृतज्ञता !’

– श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२५.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक