संतश्रेष्ठ ज्ञानदेव बैसले समाधी !

आज, २२ नोव्हेंबरला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

‘कार्तिक कृष्ण त्रयोदशी या दिवशी महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ आणि संतमुकुटमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी माध्यान्हकाळी समाधी घेतली. श्री ज्ञानदेवांनी पंढरपुरास पांडुरंगाला समाधी घेण्याचा स्वतःचा मनोदय कळवून अनुमती घेतली. आळंदी क्षेत्र समाधीस्थान म्हणून निश्चित झाले. समाधीचा दिवस उजाडला. श्री ज्ञानदेवांनी गुरुचरणांचे ध्यान करून लहानग्या सोपानास कुरवाळले. श्री ज्ञानदेव समाधीस्थानी जाण्यास निघाले. ‘नामा असे शोकाकुलित । चरणीं रत विठ्ठलाचे ।’ (श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा, अभंग १३), अशी संत नामदेवांची स्थिती झाली. संत निवृत्तीनाथांची नित्य समाधी भंग पावली.

संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ज्ञानदेवांवाचून अनाथ होऊन हमसून हमसून रडू लागले. सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या आळंदी येथे सिद्धेश्वर देवालयाच्या शेजारी असणार्‍या अजान वृक्षाखाली गुहा करून ‘समाधीस्थान’ सिद्ध केले होते. संत नामदेवांनी ते स्वच्छ केले. तुळशी, बेल अंथरून श्री ज्ञानदेवांचे आसन सिद्ध करण्यात आले. श्री विठ्ठलाने ज्ञानेश्वरांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात हार घातला. समाधीस्थानात शिरण्यावेळी श्री विठ्ठलाने त्यांना प्रेमाने हात देत आत नेले. श्री ज्ञानदेव आसनावर स्थिर झाले आणि करकमले जोडून त्यांनी नेत्र मिटले. यानंतर सर्व संतांनी समाधीच्या गुहेस शिळा लावून नंतर पुष्पवृष्टी केली. संत ज्ञानदेवांनी लिहिलेला ‘ज्ञानेश्वरी’, हा ग्रंथ वारकरी पंथाची ‘आई’ आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘अमृतानुभव’, या ग्रंथाची गोडी चाखून आजही लोक तृप्त होत आहेत.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))