खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू

इस्लामाबाद (पाकिस्तान) – खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाला. ड्रग्सच्या अतीसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी होता.

नांदेडमध्ये व्यावसायिक संजय बियाणी यांच्या झालेल्या हत्येमागे रिंडा याचाच हात होता. पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांमध्ये रिंडा याच्या संपर्कातील काही जणांचा हात होता. यासह ‘पंजाब इंटेलिजन्स हेड क्वार्टर’वरील आक्रमणासह पंजाबमधील अनेक आक्रमणांत त्याचा हात होता. रिंडा याने वर्ष २०२० मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय.एस्.आय.च्या साहाय्याने भारत सोडला होता. तेव्हापासून तो पाकिस्तानमध्ये राहून भारतात आतंकवादी आक्रमणांची योजना आखत होता. तो आतंकवाद्यांच्या माध्यमातून पंजाब, हरियाणा, तेलंगाणा आणि महाराष्ट्र येथे स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचे गुप्तचर विभागाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ३७ गुन्हे नोंद असून त्यांपैकी नांदेडमधील १४, तर पंजाबमधील २३ गुन्ह्यांचा समावेश आहे.