आळंदी (पुणे) येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त उद्या वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन !

आळंदी (जिल्हा पुणे), १९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील देवीदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृतीमंदिर, गोपाळपुरा, श्री क्षेत्र आळंदी येथे २१ नोव्हेंबर या दिवशी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दुपारी १ ते ४ या वेळेत वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा अन् अधिवेशनाचे यंदाचे हे १६ वे वर्ष असून या वेळी उत्कृष्ट धर्मकार्य करत असल्याबद्दल राष्ट्रीय वारकरी परिषद नगर जिल्हा समितीचा सन्मान केला जाईल.

या वेळी श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ह.भ.प. संतवीर बंड्या तात्या कराडकर, पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी), वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु शक्तीपीठ पालघरचे संस्थापक हिंदु भूषण श्री. श्यामजी महाराज, गोरक्षक गोपालक ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कारभारी महाराज अंभोरे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे ह.भ.प. महेश महाराज मस्के, धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर, महाराष्ट्र राज्य प्रसार प्रमुख आणि राष्ट्रीय वारकरी परिषदेचे समन्वयक ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राज्य प्रसारप्रमुख ह.भ.प. विठ्ठल महाराज अभंग आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

गायरान भूमीवरील अतिक्रमण हटवून त्या भूमी गोमातेसाठी संरक्षित कराव्यात, अवैध गोवंशहत्या करणार्‍यांंवर कारवाईसाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी, निरपराध हिंदुत्वनिष्ठांवरील आणि वारकरी यांच्यावरील अन्याय कारवाई थांबवावी, सर्व तीर्थक्षेत्री मद्य अन् मांस विक्रीवर बंदी घालावी अशा मागण्यांसाठी १५ वर्षांपासून महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे यशस्वी आयोजन होत आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, हे या वारकरी महाअधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे.