‘रुची सोया’ हे आस्थापन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा नुकताच ‘एफ्.पी.ओ.’ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर – समभाग (शेअर) विक्री बाजारात अधिकचा निधी गोळा करण्यासाठी आणलेली योजना) ही आला. तेव्हापासून या आस्थापनाच्या समभागांमध्ये जोरदार वाढ होत आहे. सध्या आस्थापनाचा समभाग १ सहस्र ११५ रुपयांवर बंद झाला आहे. हे तेच ‘रुची सोया’ आस्थापन आहे, जिचा ‘स्टॉक’ (रोखे बाजारात) कधीकाळी १५ सहस्र रुपयांवर ‘ट्रेड’ (व्यापार) करत होता आणि यापूर्वी त्याची किंमत अवघी ३.५ रुपयांपर्यंत खाली आली होती. हे सगळे कसे आणि का झाले ? ते आज जाणून घेऊया.
१. शेअर बाजारातील ‘ऑपरेटर्स’नी (संचालकांनी) ‘रुची सोया’चे शेअर्सचे भाव कृत्रिमपणे वाढवल्याने किरकोळ गुंतवणूकदार देशोधडीला लागणे
‘रुची सोया’ची मुहूर्तमेढ वर्ष १९६३ मध्ये रोवली गेली. त्या वेळी पंतनगर (उत्तराखंड) आणि जबलपूर (मध्यप्रदेश) यांसारख्या विद्यापिठांमध्ये सोयाबीनवर संशोधन चालू झाले होते. त्यानंतरच्या काळात मध्यप्रदेशपासून देशाच्या अनेक भागांत सोयाबीनची लागवड होऊ लागली. या संधीचा लाभ घेत दिनेश सहारा यांनी वर्ष १९७३ मध्ये सोयाबीनचा व्यवसाय (रुची सोया प्रॉडक्ट्स) चालू केला. प्रारंभी हा व्यवसाय केवळ सोयाबीनचा होता; पण नंतर त्यात खाद्यतेलाचाही (‘रुची सोया ऑईल’चा) समावेश करण्यात आला. बघता बघता ‘रुची सोया’ ही देशातील मोठ्या आस्थापनांपैकी एक बनली.
वर्ष २००२ मध्ये ‘रुची सोया’च्या समभागाची (शेअर्सची) किंमत १५० रुपये होती, जी वर्ष २००८ मध्ये अगदी १५ सहस्र रुपयांवर गेली. पुढील दीड वर्षात ती किंमत पुन्हा २ सहस्र रुपयांपर्यंत खाली आली. त्यानंतर सुमारे २ वर्षांत हा भाव परत १३ सहस्र रुपयांच्या जवळ पोचला. त्या वेळी अनेकांना हा चढउतार सामान्य वाटला; पण अन्वेषण यंत्रणांनी त्यात लक्ष घातले आणि वर्ष २०१० मध्ये सत्य बाहेर आले. हा सारा खेळ शेअर बाजारातील काही ‘ऑपरेटर्स’ खेळत होते. जेव्हा समभागांची किंमत अल्प होती, तेव्हा या लोकांनी खोर्याने समभाग खरेदी करून किंमत वाढवली. या वाढणार्या किंमतीमुळे लक्ष वेधले गेल्याने किरकोळ विक्रेत्यांनीही झपाट्याने समभाग खरेदी करण्यास प्रारंभ केला. समभागांची किंमत पुष्कळ वाढल्यावर एका टप्प्यावर हे ‘ऑपरेटर्स कार्टेल’ (संचालकांचा संघ) त्यांचे सर्व समभाग विकून बाजारातून बाहेर पडले. आजच्या भाषेतील ‘पंप आणि डंप’ (अल्प किंमतीत असणारे समभाग खरेदी करून नंतर त्यांची कृत्रिमरित्या किंमत वाढवून पुन्हा त्याच समभागांची विक्री करणे) या प्रकारच्या खेळामुळे किरकोळ गुंतवणूकदार सर्वाधिक देशोधडीला मात्र लागले.
२. कर्ज घेतल्यामुळे ‘रुची सोया’ आस्थापन दिवाळखोरीत जाणे
अन्य आस्थापनांप्रमाणे ‘रुची सोया’नेही कर्ज घेतले. तिने वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीत सुमारे ५ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आस्थापनाने हे कर्ज का घेतले ? याचे कारणच तिला गर्तेत नेणारे ठरले.
‘रुची सोया’ इंडोनेशिया येथून पाम तेल खरेदी करून नंतर त्याचे शुद्धीकरण करत असे. त्या काळात, म्हणजे ऑक्टोबर २०११ मध्ये इंडोनेशियाने पाम तेलावरील करशुल्क वाढवले. मूळ निर्यातदाराने शुल्कात वाढ केल्यामुळे साहजिकच उत्पादनाचे निर्मिती मूल्यही वाढले आणि त्यामुळे ‘रुची सोया’ला तेलाच्या किंमतीत वाढ करावी लागली. त्याच वेळी इंडोनेशियाने ‘रिफाईंड’ तेलावरील शुल्क मात्र न्यून केले, त्यामुळे मोठ्या व्यापार्यांनी ‘रुची सोया’कडून तेल घेण्याऐवजी थेट इंडोनेशियाचे तेल खरेदी करणे चालू केले. अशा स्थितीत आपल्या हक्काचा बाजार हातातून निसटून जात असल्याचे पाहून ‘रुची सोया’नेही लाभाचे प्रमाण (मार्जिन) अल्प ठेवून स्वस्तात तेल विकण्यास प्रारंभ केला. यासमवेतच ‘माल विकला की, पैसे द्या’, अशी ‘क्रेडिट’ची (उधारीची) सुविधाही ग्राहकांना देऊ केली. हा आर्थिक ताण सहन करण्यासाठीच ‘रुची सोया’ने कर्ज घेतले. त्यामुळे त्यांचे लवकरच अनुमाने ५ सहस्र कोटी रुपये बाजारात अडकले. ज्यांनी ‘रुची सोया’कडून उधारीवर माल खरेदी केला, त्यांनी पैसे देतांना चुकवेगिरी केली आणि दुसरीकडे अधिकोषांनी त्यांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी आस्थापनाकडे तगादा लावला. याचा व्हायचा तो परिणाम झाला. यानंतर आस्थापन ‘राष्ट्रीय कंपनी कायदा लवादा’कडे (‘एन्.सी.एल्.टी.’कडे) गेली आणि दिवाळखोरीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.
३. ‘पतंजलि’ आस्थापनाने खरेदी केल्यानंतर पूर्वीच्या किरकोळ गुंतवणूकदारांचे दिवाळे निघणे
या दिवाळखोरीमुळे वर्ष २०१९ मध्ये ‘रुची सोया’ आस्थापन समभाग विक्रीच्या बाजारातून ‘डीलिस्ट’ (बाजारातून समभाग हटवले जाणे) झाली. त्या वेळी तिच्या समभागाची किंमत होती अनुमाने ३.५ रुपये ! काही कालावधीनंतर जेव्हा आस्थापन परत ‘लिस्ट’ (समभाग विक्रीच्या बाजारात समाविष्ट होणे) झाली, तेव्हा समभागाची किंमत १७ रुपयांवर गेली, म्हणजेच अल्पावधीतच ५०० ते ६०० टक्क्यांनी किंमत वाढली. आता आपल्याला वाटले असेल की, आस्थापन ‘डिलिस्टिंग’पूर्वी ज्यांच्याकडे ‘रुची सोया’चे समभाग होते, त्यांचे तर नशीबच उघडले असेल; पण तसे झाले नाही. येथे बाजाराचे नियम माहिती नसल्याने अपसमज होतो. ‘पतंजलि’ आस्थापनाने दिवाळखोरीत गेलेले ‘रुची सोया’ आस्थापन खरेदी केल्यानंतर समभाग विक्रीच्या बाजारात सांगितले की, ते किरकोळ गुंतवणूकदारांची ‘हेअरकट’ (‘हेअरकट’ म्हणजे मूळ मूल्याऐवजी देण्यासाठी ठरणार्या आणि मूळ रकमेतील फरक) ९९ टक्क्यांनी अल्प करणार आहे. ‘रुची सोया’ प्रकरणात ‘डिलिस्टिंग’पूर्वी ज्यांच्याकडे या आस्थापनाचे १०० समभाग होते, त्यांना या आस्थापनाची नव्याने ‘लिस्टिंग’ झाल्यानंतर केवळ १ समभाग मिळाला.
त्यामुळे आस्थापनेतील ९५ टक्क्यांहून अधिक समभाग प्रवर्तकांकडे आले आणि अगदी अल्प समभाग किरकोळ गुंतवणूकदारांकडे होते. येथे एक महत्त्वाचे लक्षात घ्यायला हवे की, जेव्हा एखादे आस्थापन ‘एन्.सी.एल्.टी.’कडे जाते आणि ते आस्थापन कोणी खरेदी करते, तेव्हा त्या आस्थापनेचा नवा मालक (प्रवर्तक) किरकोळ गुंतवणूकदारांच्या समभागांच्या हिश्यात त्याच्या इच्छेप्रमाणे ‘हेअरकट’ ठेवू शकतो किंवा या स्थितीत नव्या मालकाने सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदारांना अगदी काहीच दिले नाही, तरी त्यावर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही; कारण नव्या मालकावर तसे काही बंधन नाही.
४. पतंजलीने अदानी आस्थापनाला हरवून ‘रुची सोया’ची बोली जिंकणे
‘रुची सोया’च्या दिवाळखोरी प्रक्रियेच्या वेळी त्यांच्यावर अनुमाने १२ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज होते. गौतम अदानी यांच्या ‘अदानी विल्मर’ आस्थापनाने ‘रुची सोया’ खरेदी करण्यासाठी अनुमाने ५ सहस्र ५०० कोटी रुपयांची बोली लावली होती आणि ती जिंकलीही; पण तेव्हाच पतंजलीने त्यांची हुकमी पर्याय वापरला. पतंजलीने अदानीची ही बोली अवैध असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, कुणा ‘डिफॉल्टर’ (दिवाळखोर) ठरवण्यात आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक कलम २९ ए अंतर्गत आस्थापनेच्या खरेदीची बोली लावू शकत नाही. यामागचा संदर्भ असा की, ‘रोटोमॅक’चे संस्थापक विक्रम कोठारी हे ‘डिफॉल्टर’ आहेत आणि गौतम अदानी हे त्यांचे नातेवाईक लागतात. अर्थात् येथे पतंजलीचा हा आक्षेप ग्राह्य धरण्यात आला.
अशा प्रकारे पतंजलीने त्यांच्या दुसर्या सर्वोच्च म्हणजे ४ सहस्र ३५० कोटी रुपयांच्या बोलीसह ‘रुची सोया’ आस्थापन खरेदी केले. या व्यवहारात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपये पतंजलीने स्वत: दिले आणि उर्वरित रक्कम अधिकोषांकडून कर्ज घेऊन उभारली. आता येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे पतंजलीला ‘रुची सोया’ खरेदी करण्यासाठी त्याच अधिकोषांनी कर्ज दिले, ज्यांचे पैसे ‘रुची सोया’मध्ये आधीच अडकले होते. यापूर्वी ठरलेल्या व्यवहारांतर्गत अधिकोषांना त्यांच्या ‘रुची सोया’मध्ये अडकलेल्या पैशांपैकी ५० टक्के रक्कम अधिकोषांना मिळाली; कारण येथेही अधिकोषांना ५० टक्के ‘हेअरकट’ ठरली होती. आता या आस्थापनेचा नवीन अध्याय चालू झाला आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनी त्यांच्या खाद्य आणि ‘एफ्.एम्.सी.जी.’ (फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस् – ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग) उद्योगांचे वर्गीकरण दोन आस्थापनांमध्ये केल्याचे घोषित केले आहे.’
– श्री. अभिषेक वसंत मुरकटे, वरळी, मुंबई. (१०.९.२०२२)
बुडणार्या आस्थापनावर हुशार माणूस पाण्यावरती लोणी कसे काढतो ? याचे उदाहरण !विकसित देशांचे वर्णन किंवा शास्त्र आधारित प्रगतीचे मूल्यमापन करतांना अर्थशास्त्राचा आणि त्याच्या मापदंडाने समाजाची प्रगती मोजण्याचा जो पायंडा आहे, तो मुळातच कसा चुकीचा आहे, हे दाखवणारे रुची सोयाचा व्यवहार हे एक चांगले उदाहरण आहे. मुळात अर्थशास्त्र हा मानवी भावभावनांचा वाणिज्य अभ्यास करणारा विषय आहे. भावनांवर नियंत्रण कसे आणायचे ? असा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. भावनांनी व्यवहारावर कसा परिणाम होतो, एवढेच ते अभ्यास करते. बुडणारे आस्थापन (कंपनी) एका प्रतिष्ठित आस्थापनाने घेतले की, लगेच तिचे समभाग कसे वाढतात आणि हुशार माणूस पाण्यावरती लोणी कसे काढतो ? याचे हे उदाहरण आहे. ‘पतंजलि’ आस्थापनाचे उदाहरण येथे केवळ व्यवहार दाखवण्यासाठी आहे. योगऋषि रामदेवबाबा किंवा ते करत असलेले कार्य यांना न्यून लेखण्याचा यात मुळीच उद्देश नाही; पण बाजार कसा चालतो, हे येथे दिसते. हा व्यवहार म्हटले, तर फसवणुकीचा; पण नाही म्हटले तर सचोटीचाही नाही. याच्यातून समाज आणि देश खरेच पुढे जाईल का ? याचे उत्तर आपल्याला शोधायला लागेल आणि शोधत जाऊ, तर आदर्श भावना ठेवणारा समाज निर्माण होईल. तेव्हाच खरी आर्थिक सुबत्ता येईल, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (१५.११.२०२२) |