हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार !
मुंबई, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. २४ नोव्हेंबर या दिवशी शीव येथील षण्मुखानंद सभागृहात होणार्या त्याच्या कार्यक्रमाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त आणि शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
‘जोपर्यंत वीर दास समस्त हिंदूंची क्षमायाचना करत नाही, तोपर्यंत त्याचा कार्यक्रम होऊ देणार नाही’, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी घेतली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ नोव्हेंबर या दिवशी षण्मुखानंद सभागृहाचे व्यवस्थापक समीर सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे ‘वीर दास याच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये’, अशी विनंती केली. या वेळी निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार, मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, सदस्य श्री. जगदीश गायकवाड, हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय बाळे आणि श्री. नागेश्वर राव उपस्थित होते.
वीर दास याने यापूर्वी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी., जॉन केनेडी सेंटर येथे केलेल्या ‘कॉमेडी शो’मध्ये भारतीय स्त्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांच्याविषयी अपमानास्पद विधाने केली होती. या कार्यक्रमात ‘भारतात दिवसा स्त्रियांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार केला जातो’, असे वक्तव्यही दास याने केले होते. वीर दास याच्या या वक्तव्यांमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा मलीन झाली आहे. मुंबई आणि देहली येथे या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती समितीने निवेदनात दिली आहे. वीर दास याच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरही उपलब्ध आहेत.
..तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल ! – हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक
वीर दास याच्या विधानावरून त्याला हिंदुत्व, तसेच भारतीय संस्कृती यांच्याविषयी काहीच ज्ञान नाही, असे दिसून येते. त्याची यापूर्वीची वक्तव्ये पहाता त्याच्या कार्यक्रमाला अनुमती देणे, हे त्याला आणखी गुन्हे करायला अनुमती देण्यासारखे आहे. या कार्यक्रमातही वीर दास याने आक्षेपार्ह वक्तव्ये केली, तर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक, सभागृहाचे व्यवस्थापक आणि प्रसारक यांना तात्काळ कार्यक्रमाला अनुमती नाकारल्याची नोटीस पाठवावी. मुंबईत शांतता अबाधित राखण्यासाठी हा कार्यक्रम तात्काळ रहित करावा, अन्यथा नाईलाजास्तव राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी या निवेदनात देण्यात आली आहे.
वीर दास याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी केलेली अशलाघ्य वक्तव्ये !१. सीता आणि लक्ष्मण १४ वर्षे जंगलात एकत्र राहिले अन् ही वस्तूस्थिती आहे. २. लक्ष्मण जंगलात असतांना १४ वर्षे झोपला नाही. तुम्ही कल्पना तरी करू शकता का की, तेव्हा सीता किती घाबरली असेल ? ३. हिंदू लोक गायीची लघवी पितात; कारण त्यांचे असे मत असते की, गायीच्या लघवीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ते काय स्वतःला लघवीचे तज्ञ समजतात का ? (वरील सर्व वक्तव्यांचे व्हिडिओ ट्यूबवर उपलब्ध आहेत.) |