पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !

श्री. महेश पाठक

‘मार्च २०२१ पासून सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या संकल्पामुळे धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ हा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहे. पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे भवानी क्षेत्र आणि गोवा, म्हणजे परशुराम क्षेत्र येथील धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ सत्संग असतो. या सत्संगात धर्मप्रेमी मागील १५ दिवसांत त्यांच्याकडून समष्टी सेवेसाठी झालेले प्रयत्न सांगतात. सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या मार्गदर्शनातून त्यांना पुढील १५ दिवसांत करायच्या प्रयत्नांची दिशा मिळते. समष्टी सेवा करतांना सर्व जण भगवान श्रीकृष्णाची लीला अनुभवत गुरुदेवांच्या समष्टी रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. या सत्संगातून ते एकमेकांचे प्रयत्न जाणून घेऊन त्यांतून शिकण्याचा प्रयत्नही करतात.

या सत्संगातील सर्व धर्मप्रेमी ‘समष्टी सेवेतील सहभाग वाढवणे आणि नियमित व्यष्टी साधना करणे’ यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. या धर्मप्रेमींनी मे आणि जून २०२१ या मासांत समष्टी स्तरावर केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत. – श्री. महेश पाठक, पुणे

सौ. श्यामल गराडे

सौ. श्यामल गराडे

अ. पुढाकार घेणे : सौ. गराडे यांनी कासारसाई गावातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊन तेथील धर्मप्रेमींना संपर्क केला. त्यांनी त्यांच्याशी समन्वय करून पुढाकार घेऊन अभ्यास करून पहिला ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गही घेतला.

डॉ. नीलेश लोणकर

डॉ. नीलेश लोणकर

अ. डॉ. लोणकर यांच्या रुग्णालयात गेले दीड वर्ष प्रतिदिन ५ – ६ कोरोनाबाधित रुग्ण येत असूनही स्वतः आणि कुटुंबीय यांचे रक्षण होत असल्याविषयी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटणे : डॉ. लोणकर हे गेल्या दीड वर्षापासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या रुग्णालयात त्यांच्या परिसरातील प्रतिदिन ५ – ६ कोरोनाबाधित रुग्ण येतात. अशा वेळी ‘केवळ श्रीगुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने या आपत्काळात माझे आणि माझ्या परिवाराचे संपूर्ण रक्षण झाले’, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्याविषयी त्यांच्या मनामध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.

आ. डॉ. लोणकर यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातूनही नियमितपणे व्यष्टी साधना करून त्याचा आढावा देणे आणि समष्टी सेवाही करणे : ते दिवसभर व्यस्त असूनही प्रतिदिन व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण करतात आणि नियमितपणे त्याचा आढावाही देतात. ते सर्व ‘ऑनलाईन’ सत्संग आणि शिबिरे यांना उपस्थित असतात. ते अभ्यास करून प्रवचनांमधून विषयही मांडतात. काही मासांपूर्वी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या ओळखीच्या जिज्ञासूंसाठी नवीन धर्मशिक्षणवर्ग चालू केला असून त्यात ते अभ्यास करून विषय मांडतात.

श्री. नवनाथ बर्डे

श्री. नवनाथ बर्डे

अ. स्वतः ‘स्क्रिन शेअरिंग’ची सेवा शिकून घेऊन दुसर्‍या साधकांनाही ती शिकवणे : हे धर्मप्रेमी मागील काही दिवसांपासून विविध सेवांमध्ये चांगला सहभाग घेत आहेत. त्यांनी काही दिवसांतच ‘स्क्रिन शेअरिंग’ची (विषयानुरूप भ्रमणभाषवर चलतचित्रे (स्लाईड्स) दाखवायची सेवा) सेवा शिकून घेतली. त्यानंतर ते स्वतः जोडत असलेल्या ‘ऑनलाईन’ वर्गात आणि अन्य दोन वर्गांत ‘स्क्रिन शेअरिंग’ची सेवा करत आहेत. त्यांनी वर्गातील अन्य एका धर्मप्रेमीला ही सेवा शिकवून त्यांनाही सिद्ध केले आहे. ते धर्मप्रेमीही ती सेवा करत आहेत.

आ. सूत्रसंचालनाची सेवा करण्याविषयी विचारल्यावर लगेच सिद्धता दाखवून त्यानुसार सिद्धता करून चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करणे : ते ‘प्रवचने, धर्मशिक्षणवर्ग आणि वक्ता-प्रवक्ता’ याविषयींच्या कार्यशाळांत सहभागी होऊन अभ्यासपूर्ण विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘वक्ता-प्रवक्ता’ या कार्यशाळेच्या आढावा सत्संगात त्यांना सूत्रसंचालन सेवेसाठी विचारले असता त्यांनी तत्परतेने होकार दिला. ‘भगवंत माझ्याकडून ही सेवा करून घेणार आहे’, असाच त्यांचा भाव होता. या सेवेच्या सिद्धतेसाठी त्यांना फारच अल्प कालावधी मिळाला, तरीही त्यांनी पूर्ण सकारात्मक राहून ती सेवा केली. त्यांना सांगितलेल्या सूत्रांनुसार त्यांनी संहिता सिद्ध करून ती पडताळूनही घेतली आणि त्याचा सरावही करून सत्संगात अतिशय सुरेख पद्धतीने सूत्रसंचालन केले. ‘संहिता अजून चांगली होण्यासाठी काय करायला हवे ?’, याविषयी ते नम्रतेने विचारून घेत होते, तसेच प्रत्यक्ष सेवा करतांना त्या त्या वेळी होत असलेले पालट सतर्कतेने लक्षात घेऊन ते त्यानुसार बोलत होते. आता ते ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्गालाही जोडत आहेत.

श्री. वैभव पावसकर

श्री. वैभव पावसकर

अ. ‘ऑनलाईन परिसंवाद’ किंवा ‘ऑनलाईन प्रवचने’ आदींचा तळमळीने प्रसार करणे : श्री. वैभव पावसकर यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मित्रांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग आयोजित केला. ते ‘ऑनलाईन परिसंवाद’ किंवा ‘ऑनलाईन प्रवचने’ आदींचा तळमळीने प्रसार करतात. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन घेण्याची सेवा शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रवचनाच्या अभ्यासवर्गालाही ते जोडले होते. ‘गुरुपौर्णिमेचे प्रवचन ठरवणे आणि नातेवाईक अन् मित्रमंडळी यांना अर्पणाचे महत्त्व सांगून त्यांना अर्पण देण्यासाठी उद्युक्त करणे’, यासाठी प्रयत्न करायचे’, असे त्यांनी ठरवले आहे. आता ते स्वरक्षण प्रशिक्षण वर्गालाही जोडत आहेत.

सौ. अरुणा मंदारे

सौ. अरुणा मंदारे

अ. सेवेची पुष्कळ तळमळ असणे : सौ. मंदारे यांचे वय ५६ वर्षे असूनही त्या नियमितपणे ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण वर्गासाठी जोडलेल्या असतात. या सेवेअंतर्गत त्यांनी ४ धर्मप्रेमींच्या गटाचे दायित्व घेतले आहे. त्या ‘ऑनलाईन’ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्यांचा मुलगाही आता ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संकेतस्थळ पहाणार्‍यांसाठी) असणार्‍या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला जोडत असून तो त्यामध्ये कृतीशील सहभाग घेत आहे. सौ. मंदारे यांना सेवेची तळमळ असून त्या स्वतःहून ‘काही सेवा असल्यास मला सांगा’, असे वेळोवेळी वर्गसेवकांना सांगतात.

श्री. राजेश मंगळवेढेकर

श्री. राजेश मंगळवेढेकर

अ. बांधकाम करणार्‍या कामगारांना देवतांच्या नामजपाचे महत्त्व सांगून ते करण्यासाठी उद्युक्त करणे : श्री. मंगळवेढेकर यांचा बांधकामाचा (सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा) मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या ‘साईट’वरील (बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी) कामगार दिवसभर चित्रपटातील गाणी ऐकत होते. श्री. मंगळवेढेकर यांनी त्यांना नामजपाचे महत्त्व सांगितले. आता हे कामगार नियमित कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करत आहेत.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १३.७.२०२१)