|
विना क्रमांकाची वाहने विधानभवन परिसरात प्रवेश करणे धोकादायक ! – अनंत कळसे, माजी प्रधान सचिव, विधीमंडळ सचिवालय.विधानभवनाचा परिसर अतिशय संवेदनशील असल्यामुळे अधिकृत उपप्रादेशिक परिवहन क्रमांकाची पाटी नसलेले कोणतेही वाहन परिसरात प्रवेश करू शकत नाही. अशी वाहने विधानभवन परिसरात प्रवेश करणे धोकादायक ठरू शकते. सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात ही गोष्ट कशी लक्षात आली नाही ? |
नागपूर – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी १५ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेचा आढावा घेतला. यात सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या विधानभवन परिसरात त्याच वेळी क्रमांकाची पाटी नसलेले चारचाकी शासकीय वाहन आले.
१९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. नागपूर शहरात बंदोबस्तासाठी राज्यातून १० सहस्र पोलीस येणार आहेत. विधानभवन परिसरात बारकोड प्रवेशपत्र असेल. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या वाहनांनाही परिसरात बंदी घालण्यात आली आहे. सर्व मंत्री प्रवेशद्वारातून आत चालत येतील.
क्रमांक नसलेल्या चारचाकी वाहनाच्या संदर्भात येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधला असता ‘क्रमांकाची पाटी आणि नोंदणी क्रमांक मिळाल्याविना कोणतेही वाहन सार्वजनिक ठिकाणी वापरता येत नाही’, असे त्यांनी सांगितले.