हिंदु धर्माची महती समजण्यासाठी ‘कुंकू लावणे’ या विषयावर वैज्ञानिक संशोधन होणे आवश्यक !

हिंदु धर्मातील प्रत्येक परंपरेचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे, हे हिंदु धर्मावर अनाठायी टीका करणार्‍यांनी लक्षात घ्यावे !

२.११.२०२२ या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला ‘कुंकू लाव. मग तुझ्याशी बोलतो’, असे सांगितले. त्यामुळे पुरोगामी (?) प्रसारमाध्यमांनी, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारख्या पक्षांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून पू. गुरुजींवर कोल्हेकुई चालू केली.

१. दारू प्या आणि… 

‘टीका करणार्‍यांनी पू. गुरुजी यांचे वक्तव्य पूर्ण ऐकलेलेच दिसत नाही. ‘प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे’, असे म्हणून महिला पत्रकारालाही भारतमातेसमान पूज्य मानणार्‍या पू. गुरुजींनी म्हणे महिलांना हीन वागणूक दिली. ‘दारू प्या आणि नरकात जा’, असे एका कीर्तनकाराने सांगावे आणि श्रोत्यांनी त्यातील केवळ ‘दारू प्या’ एवढेच वाक्य ऐकावे, असेच काहीसे हे झाले.

वैद्य मेघराज पराडकर

२. पुरोगाम्यांची फुकाची विज्ञाननिष्ठा 

‘आजच्या विज्ञानयुगामध्ये ‘कुंकू लावावे कि नाही’, हा जिचा तिचा प्रश्न आहे’, अशीही टीकाकारांची वक्तव्ये ऐकायला मिळाली. ‘विज्ञानयुग, २१ वे शतक, विज्ञाननिष्ठा’ असे शब्द उच्चारले की, जणू हिंदूंच्या धर्मपरंपरांवर ताशेरे ओढण्याचा परवानाच प्राप्त झाला आहे, असे काहींना वाटते. हे तथाकथित विज्ञानवादी ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण सार्थ करतात.

३. ‘कुंकू लावणे’ या विषयावर वैज्ञानिक संशोधन होणे आवश्यक 

‘हिंदु धर्मातील प्रत्येक परंपरेमागे पुष्कळ मोठे विज्ञान दडलेले असते’, हे पाश्चात्त्यांनी ओळखले आहे आणि तिथे चौकस बुद्धीने हिंदु धर्मातील लहानसहान विषयांवरही संशोधन केले जाते. हिंदु धर्मातील प्रत्येक परंपरेचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध असतो. दीर्घ काळ निरोगी जीवन जगत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ साध्य करण्याची शिकवण हिंदु धर्माने दिली आहे. ‘कुंकू लावणे’ आणि ‘कुंकू ज्या ठिकाणी लावले जाते, ते कपाळावरील ठिकाण’ या विषयांशी संबंधित संशोधनासाठी काही विषय येथे मांडत आहे. खर्‍या विज्ञाननिष्ठांनी यावर संशोधन करून दांभिक (अ)विज्ञानवादी पुरोगाम्यांना शांत करावे. धर्माचरणी हिंदु समाज अशा विज्ञाननिष्ठांप्रती नेहमीच कृतज्ञ राहील.

४. ‘कुंकू लावणे’ या विषयाशी संबंधित संशोधनासाठी काही विषय

अ. भ्रूमध्याच्या बरोबर मागे मेंदूमध्ये ‘पिनियल’ आणि ‘पिट्यूटरी’ या ग्रंथी असतात. त्यांचा संप्रेरकांच्या (हॉर्माेन्सच्या) नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. स्त्रियांच्या आरोग्यामध्ये संप्रेरकांचे संतुलन असणे पुष्कळ महत्त्वाचे असते. यासाठीही स्त्रियांना कुंकू लावण्यास सांगितले जाते का ?

आ. सौभाग्यवतीच कुंकू लावतात. विधवा स्त्रिया कुंकू लावत नाहीत. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी याचा काही संबंध आहे का ?

इ. कुंकू हे हळद आणि चुना यांच्या मिश्रणातून बनते. धर्मशास्त्रात कुंकूच लावण्यास सांगितले आहे. केवळ हळद किंवा केवळ चुना नाही. असे का ?

ई. दोन भुवयांच्या मध्ये जिथे कुंकू लावले जाते, तेथे आयुर्वेदानुसार ‘स्थपनी’ नावाचे मर्मस्थान असते. या मर्मस्थानाचे मेंदूच्या विकारांच्या दृष्टीने काही महत्त्व आहे का ?

उ. योगशास्त्रामध्ये ‘भुवयांच्या मध्ये लक्ष एकाग्र करावे’, असे सांगितले आहे. भ्रूमध्याचे एवढे महत्त्व का आहे ?

ऊ. आई बाळाला मांडीवर ठेवून थोपटतांना जिथे कपाळावर कुंकू लावले जाते, त्याच ठिकाणी हात ठेवते. असे केल्याने बाळही लगेच झोपी जाते. या स्थानाचा मेंदूतील झोपेच्या केंद्राशी काही संबंध आहे का ?

ए. परीक्षा केंद्रामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहितांना उत्तर आठवत नसेल, तर विद्यार्थी नकळत भ्रूमध्याच्या ठिकाणी पेन टेकवतात. या स्थानाचा मेंदूतील स्मृतीकेंद्राशी काही संबंध आहे का ? कुंकू लावल्याने मेंदूतील ती ती केंद्रे जागृत रहातात, असे काही आहे का ?

५. हिंदु बांधवांनो, स्वार्थी पुरोगाम्यांच्या अप्रचाराला बळी न पडता धर्माचरण करा आणि आनंदी व्हा !

काही वर्षांनी पाश्चात्त्य लोक ‘कुंकू लावणे’ या विषयावर संशोधन करतील आणि हिंदु धर्मातील परंपरा या १०० टक्के विज्ञाननिष्ठ आहेत, हे पुन्हा सिद्ध होईल; परंतु तोपर्यंत किंवा त्यानंतरही इथले पुरोगामी या सूत्रांवर विचारही करणार नाहीत; कारण त्यांना विरोधासाठी विरोध करून त्यांचा स्वार्थ साधायचा आहे. त्यांच्या या अपप्रचारामुळे धर्माचरणी सामान्य जनता मात्र भ्रमित होत आहे, हे निश्चित ! हिंदु भगिनींनो, ‘सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू लावणे’ ही आपल्या धर्मातील एक श्रेष्ठ परंपरा आहे. तिचे तंतोतंत पालन करा. पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. धर्माचरण करा आणि आनंदी व्हा ! कारण धर्माचरण केल्यानेच जीवन आनंदी होते.

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।
सुखं च न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत् ।।

– आयुर्वेद (अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक २०)

अर्थ : प्राणीमात्रांची सर्व धडपड आनंदप्राप्तीसाठीच चालू असते. धर्माचरणाशिवाय आनंदप्राप्ती होत नाही. यामुळे नेहमी धर्माचरण करावे.’

(१३.११.२०२२)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.