स्त्रियांनो, गर्भपाताचा हक्क मिळाला; म्हणून गर्भपात सोपा नाही !

१. स्त्रीला निसर्गाने दिलेले सृजनाचे देणं, हे दुधारी शस्त्र !

‘‘अगं, साडेचार मास झाले आहेत गर्भधारणेला ! इतके दिवस काय करत होतीस ?’’ ‘‘डॉक्टर, अहो, माझी मासिक पाळी अनियमितच आहे. मला वाटलं येईल आज ना उद्या.’’ ‘‘अगं, पण एवढे मास थांबलीस ?..जाऊ दे आता पुढे काय ठरवलंय ?’’ ‘‘डॉक्टर, आम्ही दोघे एकत्र रहात आहोत वर्षभर; पण घरी कुणालाच ठाऊक नाही. मी नोकरी करते. त्याला अजून नोकरी मिळालेली नाही. गर्भपात तर करावाच लागेल. तुम्ही मला त्याचा खर्च किती येईल, ते सांगा. मी पैशांची सोय करून येते.’’ अवघी २० वर्षांची ही मुलगी ! आमच्यातील हा संवाद !

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

आठवडाभराने ती परत आली. शरिरात रक्त अल्प असल्यामुळे मी तिला रक्तवाढीची २ इंजेक्शनेही दिली. सुदैवाने ही मुलगी कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसणार्‍या आणि मुलींच्या जिवाशी खेळून गर्भपात करणार्‍या वैदूकडे गेली नाही. रुग्णालयात भरती झाल्यानंतर तिच्या आणि माझ्या सुदैवाने सगळे सुखरूप पार पडले. सुखरूप म्हणजे काय की, काहीही गुंतागुंत न होता; पण रात्री १२ वाजल्यापासून सकाळी १० पर्यंत तिला असह्य कळा सहन कराव्या लागल्या. त्या न्यून करण्यासाठी आम्ही विशेष काहीच करू शकत नाही. बाळंतपणाच्या कळा सहन करतांना स्त्रीला येणार्‍या बाळाची चाहूल तरी सुखावत असते; पण या मुलीची प्रत्येक कळ केलेल्या चुकीच्या अवास्तव शिक्षेसारखी होती. या सगळ्यामध्ये तिच्यासमवेत तिचा जोडीदार होता; पण त्याला कणभर तरी त्रास झाला का ?

अशा वेळी क्षणभर राग येतो निसर्गाचा ! स्त्रीला निसर्गाने दिलेले सृजनाचे देणे, हे दुधारी शस्त्र आहे. एकीकडे ते गोजिरवाणे बाळ आणि मातृत्वाचा सुंदर आविष्कार स्त्रीच्या पदरात घालते, तर दुसरीकडे केवळ काळजावर उमटणार्‍या वेदना देते.

२. मुलींनो, स्वतःची काळजी घ्या; कारण नको असतांना राहिलेली गर्भधारणा तुमचे आयुष्य पालटू शकते !

सध्या विवाहापूर्वी लैंगिक संबंध ही अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. ७० ते ८० टक्के तरुणाई लैंगिक संबंधांना सामोरी गेलेली असते. ज्येष्ठ पिढीला कदाचित् हे सत्य पचणार नाही; पण हेच सत्य आहे. आपल्या समाजातील ढोंगीपणामुळे पालकांना या गोष्टीची जाणीव नसते किंवा ते त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. मला येथे मुला-मुलींना नैतिकतेच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. एवढंच सांगायचे आहे की, मुलींनो, स्वतःची अधिक काळजी घ्या. नको असतांना राहिलेली गर्भधारणा तुमचे आयुष्य पालटू शकते. गर्भपात करून मोकळे झाले की संपले, असे होत नाही. बर्‍याच वेळा त्या जखमेच्या खुणा मनावर रहातात आणि त्या पुढे त्रास देतात तुम्हाला…!

३. अडचणींच्या वेळी अविवाहित मुला-मुलींच्या पाठीशी उभे रहाणे, हे आदर्श पालकांचे कर्तव्य ! 

पुरुषांची वृत्ती बर्‍यापैकी स्वार्थी असते. एकदा त्यांची मैत्रीण ‘अबोर्ट’ (गर्भपात झाला) झाली की, मी पुष्कळ वेळा त्यांच्या चेहर्‍यावर सुटकेचा भाव बघते. अशा वेळी वाटते की, मुलींनी स्वतःच्या शरिराचा अधिक विचार करावा. मुला-मुलींचे लग्न ठरले असेल किंवा बर्‍याच वर्र्षांचे नाते असेल, तर शारीरिक संबंध येणारच; पण थोड्याशा ओळखीतून लगेचच नाते पुढे नेणे योग्य नाही. पालकांनी या गोष्टी मुलांशी बोलल्याच पाहिजेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हेही सांगा की, सगळी काळजी घेऊनही काही अडचण आलीच, तर आधी आमच्याकडे या. आम्हाला दुःख झाले, तरी आम्ही तुम्हाला खंबीर पाठिंबा देऊ. परिपक्व पालकत्व ते हेच. नाही का ?

४. गर्भधारणा टाळण्यासाठी ‘इमर्जन्सी पिल’ घेणे किती सुरक्षित ?

अविवाहित आणि विवाहित जोडप्यांमध्ये ‘इमर्जन्सी पिल’ (असुरक्षित संभोगानंतर घ्यावयाची एक गोळी) हा उपाय पुष्कळ सुरक्षित वाटतो; पण या गोळीचा मासिक पाळी आणि प्रजनन संस्था यांवर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार करण्याची त्यांची सिद्धता नसते. अविवाहित पुरुषही अशा संबंधांनंतर जोडीदाराला या गोळ्या देण्यास पुष्कळ उत्सुक (?) असतात. यातूनच एका मासात ३-४, तर कधीकधी ८ (बापरे !) गोळ्या घेतलेल्याही मी बघितल्या आहेत. यातील काही रुग्णांना रुग्णालयात भरती करून उपचार करावे लागले आहेत. काही वेळा तरीही गर्भधारणा होऊन त्यातून पुढे गुंतागुंत निर्माण झाली.

५. वैद्यकीय सल्ल्याविना गर्भपाताच्या गोळ्या घेणे, म्हणजे गंभीर समस्यांना आमंत्रणच !

आणखी एका प्रकारच्या गोळ्यांचा स्वैर अपवापर चालू आहे, त्या म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या ! या गोळ्यांच्या वेष्टनांवर ‘स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याविना गोळ्या घेऊ नयेत’, असे स्पष्ट शब्दांत लिहिलेले असते; पण तरीही वैद्यकीय सल्ला न घेता महिलांना या गोळ्या राजरोसपणे दिल्या जातात. हा मुली आणि महिला यांच्या जिवाशी खेळला जात असलेला क्रूर खेळ आहे, हे लोकांच्या लक्षात आलेले दिसत नाही. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता, गरोदरपणाचा कालावधी न पहाता आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून त्याची निश्चिती केल्याविना चुकीच्या पद्धतीने या गोळ्या घेतल्याने अर्धवट गर्भपात होतो. प्रचंड रक्तस्राव होऊन असे रुग्ण रुग्णालयात पोचतात. त्यानंतर ‘इमर्जन्सी क्युरेटिंग’ करावे लागते. तसेच या रुग्णांना जंतूसंसर्गाचा धोकाही अधिक असतो. हा जंतूसंसर्ग नंतर येणार्‍या वंध्यत्वाला उत्तरदायी असू शकतो. या सर्व गोष्टींची गोळ्या घेणार्‍या रुग्णांना काहीच कल्पना नसते. विवाहपूर्व आणि अनैतिक संबंधांमध्ये पुरुषांकडून त्यांच्या जोडीदाराला या गोळ्या दिल्या जाण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. काही जण सामाजिक संकेतस्थळांवर माहिती वाचून हे उद्योग करतात; पण त्यामागे वैद्यकीय ज्ञान नसल्याने होणारे धोके त्यांच्या लक्षातच येत नाहीत. ‘निमहकीम खतरेमे जान !’ (अल्प ज्ञान हानीकारक असते) याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

६. गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक !

अद्यापही तरुण पिढी, मग ती विवाहित अथवा अविवाहित असो, मोकळेपणाने गर्भनिरोधनाविषयी बोलणे, योग्य सल्ला वेळेत घेणे, या गोष्टी करू शकत नाही. ‘गर्भनिरोधक गोळ्या वगैरे वापरू नका बरं का ! नंतर दिवस रहाणार नाहीत. मग बसा पश्चात्ताप करत’, अशी वैद्यकीयदृष्ट्या पूर्णतः चुकीची दहशत घातली जाते. सध्याच्या तरुण पिढीचे करियरचे, तसेच परदेशी जाण्याचे वगैरे पुष्कळ बेत असतात. त्यात नको तेव्हा दिवस रहाण्याची भीती त्यांना या गोळ्या घ्यायला भाग पाडते. तसेच शेवटी दिवस राहिले की, ही तरुण जोडपी सैरभैर होऊन पुढचा-मागचा विचार न करता जो भेटेल, त्याच्या सल्ल्याने (बर्‍याच वेळा केमिस्टच्या (औषध विक्रेत्याच्या सल्ल्याने)) नको त्या गोळ्या घेतात आणि मग आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी त्यांची दारुण अवस्था होते. त्यामुळे वडीलधार्‍यांनी समजुतीचा मार्ग दाखवण्याची आवश्यकता आहे.

या सगळ्या समस्यांमुळे तरुण, विवाहित, अविवाहित सर्व महिला आणि मुली यांना आम्हा स्त्रीरोग तज्ञांचे कळकळीचे आवाहन आहे की, वैद्यकीय सल्ल्याविना या गोळ्या घेऊ नका. त्यात थोडक्यासाठी पूर्ण आरोग्याची हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळेच गर्भपाताचा हक्क मिळाला, तरी हे सगळे सोपे नाही. सयांनो, स्वतःची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा !’ (ऑक्टोबर २०२२)

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, पुणे.