भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १४ नोव्हेंबर – येथील श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा कोरोनाच्या कालावधीनंतर पूर्ववत् करण्यात आली आहे. या सिंहासन पूजेसाठी ‘ऑनलाईन बुकिंग’ करतांना ‘बुकिंग फुल’ असल्याचे दाखवत आहे. हा प्रकार सिंहासन पूजा चालू झाल्यापासून वारंवार होत आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे केवळ नावालाच नोटीस काढून दिनांक आणि वेळ सांगत आहे; परंतु प्रत्यक्षात बुकिंग होतच नाही. अशा प्रकारांमुळे भाविकांच्या भावनेचा खेळ होत असून सिंहासन पूजेच्या ‘पास’ची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीने जिल्हाधिकार्यांना दिले आहे. हे निवेदन मंदिर व्यवस्थापक विश्वासराव कदम यांनी स्वीकारले.
कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून सिंहासन पूजा बंद ठेवण्यात आली होती. पूजा बंद होण्यापूर्वी ज्यांनी बुकिंग केले होते, त्या भाविकांना प्रथम प्राधान्य देऊन सिंहासन पूजा करण्याची संधी देण्यात आली आहे; मात्र नवीन भाविकांना पूजेसाठी बुकिंग करण्यास अडचणी येत आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सिंहासन पूजा या प्रतिदिन ७ होत आहेत का ?, तसेच होत असल्यास पूजेचे बुकिंग कसे झाले ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी. या निवेदनावर सर्वश्री विजय भोसले, करण साळुंके, अजय मस्के, शुभम पेंदे, भूषण मिस्त्री यांच्यासह अन्यांच्या स्वाक्षर्या आहेत.