मालेगाव (जिल्हा नाशिक) – ‘टेरर फंडिंग’प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने १३ नोव्हेंबर या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने’चा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक केली आहे. १२ नोव्हेंबरच्या रात्री येथून नदवी याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले होते. त्याच्या विरोधात पुरावे मिळाल्याने अटकेची कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. न्यायालयाने मौलानाला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१. केंद्र सरकारने पी.एफ्.आय. संघटनेवर बंदी घातली आहे. ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्.आय.ए.’ने) सप्टेंबरमध्ये राज्यभरातून ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.
२. यात येथील मौलाना सहेफू रहेमान सईद अहमद याचा समावेश होता. या कारवाईनंतर मौलाना नदवी याने ‘अन्वेषण यंत्रणा भाजपच्या इशार्यावर काम करत आहेत’, असा गंभीर आरोप केला होता.
३. स्थानिक पोलिसांनी मौलाना नदवी आणि सादेन शाहिद इक्बाल अन्सारी यांना अटक केली होती. न्यायालयाने दोघांना ४८ घंटे स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश दिला होता.
४. यानंतर ‘ए.टी.एस्.’ने चौकशी करून नदवी याला सोडून दिले होते; मात्र अन्वेषणात त्याचा सहभाग आढळल्याने त्याला १२ नोव्हेंबर या दिवशी कह्यात घेऊन नाशिक येथे नेण्यात आले होते. गेल्या मासात पोलिसांनी ‘पी.एफ्.आय.’चे शहराच्या टेन्शन चौक येथील कार्यालय बंद केले होते.