भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धत सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा !

लता मंगेशकर यांनी आंचिमच्या ३३ व्या महोत्सवातील उद्घाटन सोहळ्यात केले होते आवाहन !

सुषमा स्वराज, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी आणि इतर मान्यवरांसह २००२ मध्ये नवी देहली येथे ३३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI-2002) उद्घाटन करताना लता मंगेशकर

पणजी, १३ नोव्हेंबर (पसूका) – आयुष्य लहान आणि भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असू शकते; मात्र कलेला वेळ आणि स्थानाचे बंधन नाही. त्यामुळेच कलाकार आपल्या मनात आणि हृदयात कायम जिवंत रहातो.  मुंबईत यावर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदरांजली वहाण्यात येणार आहे. या  दिग्गज गायिकेची भावपूर्ण गाणी अनेक आहेत, प्रत्येक गाण्यातून त्यांनी भारतीय चित्रपट आणि संस्कृती यांत स्वतःचे मोठे योगदान दिले आहे, तरीही या महान कलाकाराला श्रद्धांजली वहाण्यासाठी आयोजकांनी हृषिकेश मुखर्जी यांचा वर्ष १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अभिमान’ हा संगीतमय भावनाप्रधान चित्रपट निवडला आहे.

ऑक्टोबर २००२ मध्ये नवी देहली इथे झालेल्या आंचिमच्या ३३ व्या महोत्सवात, लता मंगेशकर यांनी चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमी यांना भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धत सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा, असे आवाहन केले होते.  या महोत्सवात या महान गायिकेला आदरांजली अर्पण करत असतांना त्यांच्या या आवाहनाला उजाळा देणे नक्कीच उचित ठरेल.

संपन्न आणि सभ्य भारतीय संस्कृतीचे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागे पडण्यापासून रक्षण करायला विसरू नका, असे आवाहन या महोत्सवाचे उद्घाटन करतांना लता मंगेशकर यांनी चित्रपट निर्मात्यांना केले होते. (आताचे निर्माते चित्रपटांतून हिंदूंच्या देवता, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक पुरुष आदींचे विडंबन करतात. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. लता मंगेशकर यांनी केलेले आवाहनाची ही अवहेलनाच आहे ! – संपादक) भारतीय चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब फाळके यांच्या जोडीने भारतीय चित्रपट उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम घेतलेल्या कलाकारांचा असीम त्याग कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या सहकलाकारांना केले.


कला प्रदर्शन केंद्र, खुल्या वातावरणात चित्रपटाचे सादरीकरण आणि मनोरंजन विभाग हा ५३ व्या चित्रपट महोत्सवाचाच एक भाग

पणजी – नियोजित चित्रपटगृहांमध्ये होणारे चित्रपटांचे सादरीकरण, चर्चासत्रे, ‘मास्टर क्लास’ आदी ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (आंचिमचा) एक भाग आहे; मात्र याच्या जोडीला आता महोत्सवाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कला प्रदर्शन केंद्रे, सभागृहाबाहेर खुल्या वातावरणात होणार असलेले चित्रपटांचे सादरीकरण आणि ठिकठिकाणी कार्यरत होणार असलेले मनोरंजन विभाग हेही ‘आंचिम’चाच एक भाग असणार आहेत. महोत्सवात सहभगी होणार्‍या सदस्यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिक अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत.

‘द फेस्टीव्हल माईल’, कला अकादमी ते गोवा मनोरंजन सोसायटी या रस्त्यावरील पदपथ यांवर आकर्षक कलाकृती उभारण्यात येणार आहेत. आल्तिनो येथील ‘जॉगर्स पार्क’, मडगाव येथील रवींद्र भवन आणि मिरामार समुद्रकिनारा या ठिकाणी खुल्या जागेत  चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. भगवान महावीर बालउद्यान आणि ‘आर्ट पार्क’ येथे खाद्यपदार्थाची विक्री केंद्रे आणि मनोरंजन विभाग स्थापन केले जाणार आहेत.