महत्त्वाच्या कागदपत्रांमधील एक कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) !

१. कुलमुखत्यार पत्राचे (‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चे) महत्त्व !

‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ला मराठीमध्ये ‘कुलमुखत्यार पत्र’ किंवा ‘वटमुखत्यार पत्र’ असे म्हणतात. हा दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मुले विदेशात जातांना त्यांचे आई, वडील किंवा भाऊ यांना जागांच्या व्यवहारांसाठी अधिकोष खाते हाताळण्यासाठी, तसेच छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दिली जाते. नावाप्रमाणे ‘पॉवर’ (अधिकार) असल्याने या दस्तऐवजानुसार अधिकारांचे हस्तांतर केले जाते. ‘पॉवर ऑफ ॲटर्नी ॲक्ट १८८२’ आणि ‘कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट १८७२’ यांमध्ये ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’विषयी तरतुदी आढळतात. ‘आपल्या स्वतःच्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीला दिलेले अधिकार पत्र’, म्हणजे ‘पॉवर ऑफ ॲटर्नी.’ यानुसार जी व्यक्ती अधिकार देते, तिला मुख्य व्यक्ती (प्रिन्सिपल), तर ज्यांना अधिकार प्रदान केला जातो, त्याला ‘दलाल’ असे संबोधण्यात येते.

२. ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चे प्रकार

अ. स्पेसिफिक (विशिष्ट) पॉवर ऑफ ॲटर्नी

आ. जनरल (सर्वसाधारण) पॉवर ऑफ ॲटर्नी

३. ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’च्या संदर्भातील महत्त्वाच्या तरतुदी !

३ अ. मानसिक संतुलन न ढळलेली, तसेच कायद्याने सज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ देऊ अथवा घेऊ शकते. लिहून देणार्‍या आणि लिहून घेणार्‍या एकाहून अधिक व्यक्ती असू शकतात. त्या दस्तऐवजाला ‘जॉईंट पॉवर ऑफ ॲटर्नी’ म्हणतात. यावर दोन साक्षीदारांच्या स्वाक्षर्‍या असणे आवश्यक आहे.

३ आ. ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’मध्ये जी कामे करण्याचा अधिकार दलालाला (कुलमुखत्यार पत्र धारकाला) दिलेला आहे, तेवढीच कामे करण्यापर्यंत त्याचा अधिकार मर्यादित असतो. जेवढे आणि जसे काम ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’मध्ये नमूद केलेले असेल, तसे अन् तेवढेच त्याला करता येते. त्यात शाब्दिक व्याख्येला ‘इंटरप्रिटेशन’ला वाव नसतो, उदा. जर मुलाने वडिलांना त्याच्या अधिकोषाचे व्यवहार करण्याचे, त्याच्या नावावर असलेल्या जागेचे वीजदेयक, घरपट्टी आणि ‘सोसायटी मेन्टेनन्स्’ भरण्याचे अधिकार दिले असतील; परंतु जागा भाड्याने देण्यास करार करण्यासाठीचा अधिकार दिलेला नसेल, तर वडील कुणालाही जागा भाड्याने देऊ शकत नाहीत. ‘जे लिहिले असेल, तेवढाच अधिकार असतो’, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सबब ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करतांना विचारपूर्वक अटी आणि शर्ती यांचा अंतर्भाव असावा. पुष्कळदा अधिवक्त्यांकडून लिखाण ‘कॉपीपेस्ट’ करण्यात येते. त्यामुळे लिखाण नीट वाचणे आवश्यक असते.

३ इ. ‘दलालांनी (कुलमुखत्यार पत्र धारकांनी) केलेली कामे मुख्य व्यक्तीने (‘प्रिन्सिपल’ने) स्वतः केलेली आहेत’, असे समजले जाते. ती कामे आणि त्यांचे परिणाम मुख्य व्यक्तीवर बंधनकारक असतात; मात्र दलालाने स्वतःहून कुणाची फसवणूक केल्यास किंवा अवैध कामे केल्यास, त्याचे दायित्व मुख्य व्यक्तीवर (‘प्रिन्सिपल’वर) येत नाही. स्वाभाविकपणे दलालाने स्वतःच्या लाभासाठी काम न करता मुख्य व्यक्तीच्या भल्यासाठी काम करणे अपेक्षित असते.

३ ई. जागेची खरेदी-विक्री करण्यासाठी किंवा जागेतील मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी ‘रजिस्टर्ड पॉवर ऑफ ॲटर्नी’ची आवश्यक असते. थोडक्यात सरकारच्या नोंदणी (रजिस्ट्रेशन) कार्यालयात त्याची नोंद करणे आवश्यक असते. इतर गोष्टींमध्ये, उदा. अधिकोषाचे व्यवहार इत्यादींच्या संदर्भात अशा नोंदीची आवश्यकता नसते. नोटरीकृतही चालते.

३ उ. दलालाला (कुलमुखत्यार पत्र धारकाला) दिलेले अधिकार तो त्याच्या हाताखाली काम करणार्‍या किंवा इतर कुणालाही हस्तांतरित करू शकत नाही, म्हणजे मुख्य विषयातील ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दुसर्‍या कुणाला देऊ शकत नाही.

३ ऊ. अनेकदा ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये वापरली जाते. दावा प्रविष्ट करणे, साक्ष देणे आदींसाठी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दिली जाते. सर्वाेच्च न्यायालयाने ‘जानकी वासुदेव भोजवानी विरुद्ध इंड्स इंड बँक’ या खटल्यात असा निवाडा दिला आहे की, दलालाला संबंधित प्रकरणाविषयी ज्या गोष्टींची वैयक्तिक माहिती आहे, तेवढीच माहिती आणि साक्ष तो ‘प्रिन्सिपल’च्या वतीने न्यायालयात देऊ शकतो.

३ ए. जर मुख्य व्यक्ती (प्रिन्सिपल) किंवा दलाल यांचा मृत्यू झाला किंवा दोघांपैकी कुणी दिवाळखोर झाले अथवा कुणाचे मानसिक संतुलन बिघडले, तर ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ रहित होते. विशिष्ट कालावधीसाठी आणि विशिष्ट कामासाठी दिलेली ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ काम अन् कालावधी संपल्यावर आपोआप रहित होते.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.