अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार जे आक्षेपार्ह बोलले, त्याचे मी समर्थन करणार नाही. उलट कोणत्याही महिलेचा असा अवमान व्हायला नको, असे माझे मत आहे; परंतु सुळे यांना कुणी काही बोलले, तर त्यांचा अवमान होतो. मग इतर महिला काय रस्त्यावर पडल्या आहेत का ? त्या वेळी कुणी काहीच कसे बोलत नाही ?, असा प्रश्न भाजप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी १० नोव्हेंबर या दिवशी त्या अमरावतीत भाजपच्या महिला मेळाव्याला आल्या असता पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.
सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी सरकारने निश्चिती न करताच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला १ मास कारागृहात टाकले. तिच्या आई-वडिलांना जाऊन भेटल्यानंतर त्यांची अवस्था मला पहावत नव्हती. वास्तविक केतकी हिने ते लिहिलेच नव्हते. तिला यात अडकवण्यात आले. स्वप्ना पाटकर तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्यांना किती घाणेरड्या शिव्या दिल्या. त्या वेळी महाराष्ट्राचा अवमान झाला, असे कुणी म्हटले का ? अभिनेत्री कंगना रनौत हिचे घर पाडण्यात आले. त्यानंतर ‘उखाड के फेक दिया’ असे म्हटले गेले. तेव्हा सर्व शांत का होते ?’’
संजय राठोड यांच्या विरोधात माझी तक्रार !
सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असतांना संजय राठोड यांनी पूजा चव्हाण या युवतीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पोलिसांनी गुन्हा नोंद केला नव्हता. या विरोधात मी त्या वेळी न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड मंत्री असले, तरी माझी भूमिका पालटली नाही.’’