राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडून मारहाण केल्याचे प्रकरण

ठाणे – येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ७ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता चालू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना दुपारी १ वाजता पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर अटक करण्यात आली. वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुष्कळ गर्दी केली असून ‘जितेंद्र आव्हाड बाहेर येईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही तेथे बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले. त्यामुळे वाद झाला. यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली.

हे सरकार मला रोखू शकत नाही ! – जितेंद्र आव्हाड

अटकेच्या कारवाईप्रकरणी आव्हाड म्हणाले, ‘‘मला पोलीस ठाण्यात नोटीस घेण्यासाठी बोलावण्यात आले. मी येथे आल्यावर पोलीस उपायुक्त राठोड यांनी मला ‘तुम्हाला अटक करावी लागेल’, असे सांगितले. हे पोलिसी कायदे आहेत. चित्रपटाचे विकृतीकरण झालेले आहे. या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मराठा समाजाचीही अपकीर्ती झाली. त्यावर आक्षेप घेतल्याने कारवाई होत असेल, तर मी महाराजांचा मोठा रक्षक आणि अभ्यासक आहे. हे सरकार मला रोखू शकत नाही. हे सरकार महाराजांना अपकीर्त करणार्‍यांचे आहे कि रोखणार्‍यांचे ? अनैतिक इतिहास दाखवला जाण्यासाठी अटक होणार असेल, तर मी कारागृहातही जाईन. घरी जेवायचे, ते कारागृहात जेवू. जामीन पण घेणार नाही. मी या अटकेचे स्वागत करतो.’’