हिंदूंना हलाल मांस विकणार्‍या अंधेरी (मुंबई) येथील चिकन दुकानाच्या मालकाला मनसेकडून तंबी !

मुंबई – मनसेच्या व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १० नोव्हेंबर या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी येथील ‘नथिंग बट चिकन’ या चिकन दुकानात जाऊन ‘हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ मांस न विकता ‘झटका’ मांस उपलब्ध करून द्यावे’, अशी तंबी दिली. ‘हिंदूंना झटका मांस उपलब्ध करून न दिल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन करू’, अशी चेतावणी या वेळी श्री. सिद्धार्थ यांनी दिली.

‘नथिंग बट चिकन’ या चिकन दुकानातील संपूर्ण मांस हलाल पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात येत आहे. या दुकानात हिंदु ग्राहक येऊनही त्यांच्यासाठी झटका मांस उपलब्ध करून न देता त्यांना हलाल पद्धतीचे मांस विकण्यात येते. याविषयीची माहिती मिळताच मनसेने तेथे जाऊन दुकानाचे मालक आणि कर्मचारी यांना समज दिली. ‘राज्यघटनेने प्रत्येकाला स्वतःच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला असतांना हिंदूंवर हलाल मांसाची सक्ती कशासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या दुकानाच्या मालकाला झटका पद्धतीचे मांस विक्रीसाठी ठेवण्यासाठी समयमर्यादा दिली आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करणार्‍या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !