अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्भुत पराक्रम आणि प्रताप यांचे ठिकाण म्हणजे प्रतापगड ! या प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी क्रूर, कपटी, धिप्पाड आणि शक्तीशाली अफझलखानाला बुद्धी-युक्ती अन् शक्तीने ठार करून ‘शिवाजी’ नावाचा दरारा भारतभरातील मोगल, तसेच अन्य पातशाह्यांमध्ये निर्माण केला. घोडदळासह ४० सहस्रांहून अधिक सैन्य, तोफा, बंदुका, हत्ती, अनेक सरदार यांसह छत्रपतींचे पारिपात्य करण्याच्या निश्चयानेच आलेल्या, वाटेतील हिंदूंची तुळजापूरसह अनेक मंदिरे उद्ध्वस्त केलेल्या, अनेकांची हत्या केलेल्या अफझलखानाला पराभूत करणे मोठे कठीण काम होते; मात्र छत्रपतींनी बुद्धी आणि युक्ती पणास लावून खानाला गाफील ठेवले अन् योग्य संधी मिळताच खानाचा कोथळा बाहेर काढत त्याला ठार केले. ‘मरणान्तानि वैराणी !’ (मरणानंतर वैर संपते) या हिंदूंच्या शिकवणुकीनुसार छत्रपतींनी मोठे मन दाखवत अफझलखानाचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधले. अफझलखानाचे थडगे बांधतांना छत्रपतींना कुठे कल्पना असणार की, हे थडगे आगामी काळात ताणतणावाचे कारण बनू शकेल ! गेल्या अनेक वर्षांपासून या थडग्याजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून ते वाढवण्यात आले. तेथे अफझलखानाचा उरूस (पुण्यतिथीचा उत्सव) भरू लागला. अफझलखानाला सुफी संत बनवण्याचे कारस्थान रचले गेले. ‘अफझलखानाला नवस बोलल्यावर मुलगा होतो’, अशा खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. भाबडे लोक याला बळी पडू लागले. वन विभागाची काही एकर भूमी या ‘लँड जिहाद’मुळे धर्मांधांनी घशात घालून त्याचा ट्रस्टही बनवला. शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना या गोष्टी लक्षात आल्यावर ते अतिक्रमण काढण्यासाठी, प्रतापगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आंदोलन चालू केले. अनेक वर्षे आंदोलने, निवेदने देणे, शासनाकडे पाठपुरावा करणे, न्यायालयीन लढा दिल्यावर आताच्या शासनाने शिवप्रतापदिनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढले ! ‘उशिरा का होईना..’ या म्हणीनुसार शासनाने मोठ्या संख्येने पोलीस बळ मागवून अतिक्रमण उद्ध्वस्त केले. शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन !

 पुरातत्व विभागाची अनास्था !

भारतातील गड-दुर्ग, प्राचीन मंदिरे, स्थळे यांचे संरक्षण आणि जतन करणे याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे असते. महाराष्ट्रातील एखाद्या गडावर काही कार्यक्रम करायचा असेल, तरी त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती लागते. तीही बहुत्प्रयासाने मिळते. येथे मात्र अफझलखानाच्या थडग्याभोवती अनधिकृत बांधकाम हळूहळू चालू करून ते काही एकर होईपर्यंत, तेथे धर्मांधांना रहाण्याची व्यवस्था होईपर्यंत पुरातत्व विभाग झोपला होता का ? कि त्यांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी याकडे दुर्लक्ष केले ? याचीही चौकशी होऊन यामागील सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर येणे आणि संबंधितांना शिक्षा होणेही आवश्यक आहे. पुरातत्व विभागाच्या या ‘गाढ निद्रे’मुळेच आज विशाळगड, रायगड, लोहगड, कुलाबा गड, दुर्गाडी गड, शिवडी गड, माहीम गड, श्री क्षेत्र मलंगगड येथे धर्मांधांनी अतिक्रमण केले असून ते काढणे आता डोईजड झाले आहे. पुरातत्व विभागावर झालेले अकार्यक्षमता, निष्क्रीयता यांचे अतिक्रमणही शासनाने दूर करून तेथे कार्यक्षम, तत्पर, धाडसी अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती करावी अन् दुर्गप्रेमी, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांना निश्चिंत करावे. हाच भाग वन विभागाविषयी सांगावा वाटतो. एखाद्या हिंदु संतांचा आश्रम आणि मठ वन विभागाच्या जागेत असतो, तेव्हा त्यातील अनधिकृत बांधकाम काढण्यास जेवढी तत्परता वन विभाग दाखवतो, तेवढी या ठिकाणी आणि तीही काही एकर भूमी हातातून जाऊनही वन विभाग थंड का बसला ?

 हिंदुत्वनिष्ठ ‘मावळे’ !

शासनाने अफझलखानाच्या थडग्याजवळील अतिक्रमण नष्ट केले असले, तरी यामध्ये हिंदुत्वनिष्ठांचाच मोठा वाटा आहे. गत २५ वर्षांपासून श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन, हिंदु एकता आंदोलन, प्रतापगड उत्सव समिती, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ यांनी हा विषय लावून धरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे अतिक्रमण काढण्यास ३ वेळा सांगितले, तसेच अतिक्रमणकर्ते सर्वाेच्च न्यायालयात गेले. सर्वाेच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय दिली. हिंदुत्वनिष्ठांनी या वर्षीही हा विषय शासनाकडे लावून धरला आणि आंदोलनाची चेतावणी दिली. त्यानंतर शासनाने हे अतिक्रमण काढले. एवढी वर्षे छत्रपतींचा प्रतापगड अतिक्रमणमुक्त होण्यासाठी विविध माध्यमांतून विषय धगधगता ठेवणारे हिंदुत्वनिष्ठ हेच आजच्या काळातील छत्रपतींचे मावळे म्हणून शोभून दिसतात. अन्यथा आजचा दिवस पहायला मिळाला नसता.

येथे महत्त्वाचे म्हणजे आज अतिक्रमण काढल्यावर श्रेय घेण्यास पुढे आलेल्या पुरोगामी संघटनांनी एवढ्या वर्षांमध्ये हे आणि अन्य गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी कधी आवाज उठवल्याची एकही बातमी नाही. थिल्लर विषयांवर गोंधळ घालणे आणि हिंदुत्वनिष्ठांच्या विषयांना विरोध करणे एवढेच यांचे काम ! शिवप्रतापभूमीचा विषय शासनाने सोडवला असला, तरी अजूनही शहरांना परकीय आक्रमकांची नावे असणे, छत्रपतींच्या २ जयंती असणे, ‘समर्थ रामदासस्वामी-छत्रपती’ गुरु-शिष्य नात्यावरून निर्माण होणारे वादही शासनाने संपवावेत, हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम पाडणार्‍या शासनाने छत्रपतींचे सर्व गड तात्काळ अतिक्रमणमुक्त करावेत, ही जनतेची अपेक्षा !