सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.
१० नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ती. अप्पाकाका कसे सेवारत झाले ?’, याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
हे लिखाण सद्गुरु डॉ. वसंत आठवले संत होण्यापूर्वीचे असल्याने या लेखातील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही ! – संपादक
मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/626804.html
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेत आणून सेवारत करणे
१ उ. ‘अधूनमधून नामजप करणे, अनुक्रमणिका लावणे आणि लिखाणाचे भाषांतर करणे’, या सेवांव्यतिरिक्त इतर कोणतीही साधना न करताही केवळ ४ वर्षांत संतपदावर आरूढ होणे : प.पू. डॉक्टरांनी मला अनुक्रमणिका लावणे आणि भाषांतर करणे या सेवांव्यतिरिक्त नामजप, ध्यान, स्वभावदोष निर्मूलनाची सारणी भरणे, साधकांच्या साधनेचा आढावा घेणे, सत्संगाला बसणे आणि साधकांकडून होणार्या चुकांवर लक्ष ठेवणे, यांपैकी कोणतीही साधना सांगितली नव्हती. त्यांनी मला गुरुमंत्र दिला नव्हता आणि त्यांनी मला माझ्याकडून होणार्या चुकाही स्पष्टपणे कधीही सांगितल्या नाहीत. कदाचित् मी त्यांचा मोठा भाऊ असल्याने त्यांना माझ्या चुका सांगणे जड जात असावे. मीही ‘अधूनमधून नामजप करणे, त्यांनी दिलेली अनुक्रमणिका लावणे आणि लिखाणाचे भाषांतर करणे’, या सेवांव्यतिरिक्त इतर कोणतीही साधना करत नव्हतो. असे असतांना ‘गुरुवर्र्यांनी मला ४ वर्षांत संतपदावर आरूढ करण्याची कृपाा कशी केली ?’, याचा मी विचार करू लागलो. (‘पू. अप्पा पहिल्यापासूनच सात्त्विक आहेत. त्यामुळे मी त्यांना करायला सांगितलेली सेवा अन् साधना करून ते केवळ ४ वर्षांत संतपदी आरूढ झाले.’ – डॉ. जयंत आठवले)
२. ‘गुरुवर्यांनी ४ वर्षांत संतपदावर आरूढ करण्याची कृपा कशी केली ?’, याविषयी विचार करतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. साडेपाच मास रामनाथी आश्रमात राहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना जवळून अनुभवतांना त्यांना मनोमन गुरु म्हणून शरण जाणे : मी गुरुवर्यांसह साडेपाच मास रामनाथी आश्रमात राहिलो. त्या कालावधीत त्यांचे वागणे, बोलणे, मार्गदर्शन करण्याची पद्धत, आश्रमात येणार्या अन्य संतांशी वागणे, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची त्यांना असलेली तळमळ, हिंदु राष्ट्राची निर्मिती आणि विश्वकल्याणासाठी विश्वभर हिंदु धर्मप्रसार यांसाठी अहोरात्र चाललेली धडपड, तसेच अध्यात्मातील शास्त्रीयरित्या केलेले अद्वितीय संशोधन, या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर नकळतपणे ठसा उमटला. त्यामुळे मी त्यांना गुरु म्हणून मनोमन शरण गेलो. त्यांनीही माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. माझे भाग्य म्हणजे मला गुरूंचा शोध घ्यावा लागला नाही; परंतु माझी चूक म्हणजे की, घरात सर्वश्रेष्ठ गुरु (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) असतांना आणि मला अध्यात्माची आवड असतांनाही मी आपल्याच तंद्रित राहिलो. मी त्यांचे कार्य आणि व्यक्तीमत्त्व यांकडे लक्ष दिले नाही अन् माझ्या आयुष्यातील १० – १५ वर्षे फुकट घालवली.
२ आ. लिखाणाचे भाषांतर करत असतांना सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचा आपोआप अभ्यास होऊन ज्ञानयोगातील पूर्वी न कळलेले अनेक बारकावे लक्षात येणे : मी अनुक्रमणिका लावण्याची सेवा करत असतांना, विशेषतः भाषांतर करण्याची सेवा करत असतांना माझा सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचा आपोआप अभ्यास झाला. त्यात कोणत्याही शंका आल्यास मी गुरुवर्यांना विचारायचो अन् तेही माझे समाधान होईपर्यंत उत्तर द्यायचे. त्यामुळे मला अध्यात्मशास्त्राच्या ज्ञानयोगातील पूर्वी न कळलेले अनेक बारकावे कळले.
२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेल्या दूरभाषवरील संभाषणातून त्यांचे निरनिराळ्या विषयांतील दृष्टीकोन आणि ‘ते कसे मार्गदर्शन करतात ?’, यांविषयी शिकायला मिळणे : वर्ष २००९ नंतर जरी मला प.पू. डॉक्टरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही, तरी त्यांनी दिलेल्या भाषांतराच्या सेवेमुळे मी दिवसातील १६ – १८ घंटे मनाने त्यांच्या जवळच असायचो. तसेच प्रत्येक ४ – ५ दिवसांनी दूरभाषवरून आमचे बोलणे व्हायचे आणि अजूनही होते. त्या वेळी मी त्यांना माझ्या शंका विचारतो आणि गुरुवर्यही त्यांना आलेल्या नव्या अनुभूती सविस्तर सांगतात. त्यातून मला त्यांचे निरनिराळ्या विषयांतील दृष्टीकोन आणि ‘ते कसे मार्गदर्शन करतात ?’, यांविषयी शिकायला मिळते.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (आषाढ अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (६.८.२०१३))