भ्रष्टाचारी लोक देशाची वाट लावत आहेत ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – भ्रष्टाचारी लोक देशाची वाट लावत आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात काय चालू असते ?, ते तुम्ही बघता. कोण त्यांच्यावर कारवाई करत आहे ? जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना विकत घेतले जाते, त्याचा व्हिडिओ पाहिला आहे आम्ही. तुम्हाला (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस्.व्ही. राजू यांना उद्देशून) असे म्हणायचे आहे का की, ते सर्व योग्य आहे आणि देशाच्या विरोधात नाही ? अशा लोकांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कडक कारवाई होत नाही, त्यामुळे ते त्यांचे  भ्रष्टाचाराचे प्रकार चालूच ठेवतात. हेच भ्रष्टाचाराचे मूळ आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगाणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या आमदारांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या व्हिडीओचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने वरील शब्दांत भ्रष्टाचार्‍यांवर टीका केली.

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा यांच्यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू होती. त्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस्.व्ही. राजू यांनी युक्तीवाद करतांना ‘यांच्या सारखी माणसे देशाची वाट लावत आहेत’, असे म्हटले. त्यावरून ‘तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का कोण देशाची वाट लावत आहे?’, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने विचारत वरील विधाने केली.

संपादकीय भूमिका

जे जनतेला प्रतिदिन अनेक वर्षे दिसत येत आहे, तेच आज सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. ही स्थिती सर्वपक्षीय शासनकर्त्यांनाही ठाऊक आहे, तरीही या स्थितीला पालटण्यासाठी कुणीच ठोस आणि कठोर प्रयत्न करत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद आहे !