‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ चालू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. नूतनीकरण केलेल्या बेती पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या वेळी स्थानिक आमदार केदार नाईक, पोलीस महासंचालक जसपाल सिंह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्याबाहेरील लोक गोव्यात येऊन गुन्हेगारी करतात. निरनिराळ्या प्रकारचे गुन्हे येथे घडत आहेत. ‘सदनिका भाड्याने देतो’ असे सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणे, ‘दुबई येथे सौंदर्यस्पर्धेला नेतो’, असे सांगून युवतीकडून १ लाख रुपये उकळणे आदी अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गोमंतकियांनी याविषयी सतर्क राहून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना साहाय्य करावे. देशभरात गोवा पोलिसांची कार्यक्षमता चांगली आहे. गोव्यात गुन्ह्याचे उकल होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. नागरिक पोलीस ‘ॲप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवू शकणार आहेत. यासाठी तक्रारदाराला स्वत:च्या ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तक्रारीनंतर पोलीस त्यावर कारवाई करतील.’’

याप्रसंगी पोलीस महासंचालक जसपाल सिंह म्हणाले,

पोलीस महासंचालक जसपाल सिंह

‘‘राज्यात घडत असलेले सायबर गुन्हे चिंताजनक आहेत. यासाठी पोलीस विभागाने लोकप्रतिनिधी आणि संस्थांचे प्रतिनिधी यांना सायबर गुन्ह्यांविषयी शिक्षित करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’’

बेती येथील पोलीस चौकीचे ८० लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. स्थानिक आमदार केदार नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस चौकीत लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बेती येथील पोलीस चौकीला ऐतिहासिक महत्त्व

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘बेती येथील पोलीस चौकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पोर्तुगीज राजवटीत गोवा मुक्तीलढ्याच्या वेळी स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांनी शस्त्रे लुटण्यासाठी बेती येथील पोलीस चौकीवर आक्रमण केले होते.’’