संजय राऊत यांना जामीन संमत

संजय राऊत

मुंबई – गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन संमत करण्यात आला. ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ३१ जुलै या दिवशी अटक झाली होती.

मागील १०२ दिवसांपासून संजय राऊत हे कारागृहात होते. २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन संमत झाला. या घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांनाही जामीन संमत झाला आहे. ‘संजय राऊत हे पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार होते. प्रवीण राऊत यांच्या आडून संजय राऊत यांनी हा घोटाळा केला’ असे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आरोपपत्रात म्हटले आहे.


उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जामिनाच्या आदेशाला स्थगिती द्या ! – ईडी

संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करतांना ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले, ‘‘तपासयंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा, असे नाही; मात्र आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जामिनाच्या आदेशाला स्थगिती द्यावी.’’ ‘ईडी’च्या या अर्जावर १० नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.