शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणार्‍या खोट्या आस्थापनांच्या घोटाळ्यांची चौकशी करा !

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनी शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या खोट्या आस्थापनांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. जनतेचा लुबाडलेला पैसा जनतेला परत मिळालाच पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या अशा खोट्या आस्थापनांच्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात यावे, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले, अनिल सरगर, सागर सरगर, विनायक खेडेकर, अनिल जाधव, विजय जाधव, गोटखिंडीचे सहकारी पैलवान विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या अनेक आस्थापनांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने अनेक मासांपासून राज्यात मोठे आंदोलन चालू आहे. या आस्थापनांनी सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा महाराष्ट्रात केला आहे. या विषयी वेळोवेळी तक्रारीही प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. तरीही संबंधित संचालकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.