‘गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ज्या दिवशी स्वतःच्या जीवनात आले, तोच स्वतःचा जन्मदिवस आहे’, असा अपार भाव असलेल्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार
कु. मयुरी डगवार

१. पू. आईचा जन्मदिनांक समजण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही त्याविषयी न समजणे

‘पू. आईचा जन्म झाल्यानंतर तिच्या जन्मदिनांकाविषयी लिहून ठेवण्याचे तिच्या घरातील व्यक्तींच्या लक्षात आले नाही. तिचे वडीलही काही दिवसांनी तिचा जन्मदिनांक विसरले. पू. आईला शाळेत प्रवेश घेतांना तिच्या वडिलांनी ठरवून एक जन्मदिनांक सांगितला. त्यानंतरही अनेक वेळा पू. आईच्या वडिलांनी, तसेच पू. आईचे लग्न झाल्यानंतर माझ्या बाबांनी (कै. विजय डगवार यांनी) आणि माझ्या मामाने आईचा जन्मदिनांक मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; पण त्या वेळीही जन्मदिनांक समजला नाही. आईने साधना चालू केल्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार जन्मतिथीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात आल्यावर माझ्या बाबांनी तिचा जन्मदिनांक मिळण्यासाठी प्रयत्न केले; परंतु जन्मदिनांक मिळाला नाही.

२. यानंतर पू. आई त्याविषयी म्हणाली, ‘‘ज्या दिवशी आपल्याला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी समजले, तोच आपला जन्मदिनांक आहे. गुरु आपल्या जीवनात आल्यावर गुरूंच्याच हातात सर्वकाही असते. त्यामुळे जन्मकुंडली नाही, तर नाही. परात्पर गुरु डॉक्टर हेच आपल्यासाठी सगळ्यांत महत्त्वाचे आहेत.’’

३. पू. आई जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त (तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) झाल्यावर म्हणाली, ‘‘आता माझी जन्मकुंडली किंवा जन्मदिनांक नसला, तरी गुरूंनी मला सर्वांतून मुक्त केले. त्यामुळे ‘व्यक्तीने साधना करणे’, हेच महत्त्वाचे आहे.’’

४. ‘पू. आई संतपदावर विराजमान झाल्यानंतर आध्यात्मिक संशोधनासाठी तिचा जन्मदिनांक हवा आहे’, असे समजणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पू. आईचा जन्मदिनांक समजणे

१०.४.२०२२ या दिवशी पू. आई संतपदावर विराजमान झाली. त्या वेळी आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने आईचा जन्मदिनांक हवा होता. त्या वेळी ‘त्याविषयी अनेक वेळा शोध घेतला, तर आता जन्मदिनांक मिळेल कि नाही’, असे वाटत होते. तेव्हा पू. आई म्हणाली, ‘‘आता संशोधनासाठी जन्मदिनांक हवा आहे, तर एकदा विचारून बघूया. परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असेल, तर जन्मदिनांक समजेल.’’ त्यानंतर माझ्या मामाने आईच्या जन्मगावी चौकशी केल्यानंतर आईचा खरा जन्मदिनांक समजला. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच पू. आईचा जन्मदिनांक कळू शकला.

५. ‘साधकांनी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता सर्व भार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सोपवून केवळ साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, हे लक्षात येणे

यातून ‘साधकांच्या आयुष्यात ज्या गोष्टींविषयी कळणे आवश्यक असते, त्या गोष्टी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच समजतात. त्यामुळे साधकांनी कुठल्याच गोष्टीचा विचार न करता सर्व भार गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) सोपवून केवळ साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, असे पू. आईकडून मला या प्रसंगात शिकायला मिळाले.’

– कु. मयुरी विजय डगवार, (पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची कन्या) फोंडा, गोवा. (५.११.२०२२)