जगमान्य भारतीय शिक्षणपद्धत !

ब्रिटनमधील शिक्षणक्षेत्राच्या केंद्रस्थानी वर्ष १८५६ पासून असलेल्या ‘वेलिंग्टन कॉलेज युके’च्या वतीने भारतातील पहिली शाळा पुण्यात चालू करण्यात येत आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ (पूर्वेकडील ऑक्सफर्ड विश्वविद्यालय), असा पुणे शहराचा लौकिक असल्यामुळे भारतातील शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्याची निवड करण्यात आल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. तक्षशिला, नालंदा यांसारखी जगातील सर्वोकृष्ट विश्वविद्यालये असणार्‍या भारतानेच जगाला ‘विश्वविद्यालय’ ही संकल्पना सर्वप्रथम दिली. दुर्दैवाने आज तोच भारत मेकॉलेच्या इंग्रजाळलेल्या निरुपयोगी शिक्षणपद्धतीत अडकला आहे.

खरेतर भारतियांनी भारताला गुलामीच्या जोखडात लोटणार्‍या विदेशी शिक्षणप्रणालीचा अभिमान बाळगावा, हेच मुळी लज्जास्पद आहे. प्राचीन भारत हा शिक्षणक्षेत्रात अग्रेसर होता. विदेशी आक्रमक सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तक्षशिला केवळ जगभरातील सर्वांत प्रसिद्ध विश्वविद्यालयच नव्हते, तर त्या काळी चिकित्साशास्त्राचे एकमेव केंद्रसुद्धा होते. ५०० इसवी सनपूर्वी जेव्हा जगभरात चिकित्साशास्त्राची परंपराही नव्हती, तेव्हा तक्षशिला आयुर्विज्ञानाचे सर्वांत मोठे केंद्र होते. ‘तक्षशिला’ हे जगातील पहिले विश्वविद्यालय मानले जाते. तक्षशिला-नालंदा विश्वविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जगभरातून सहस्रो विद्यार्थी भारतात येत. इंग्रजांनी भारतियांना नीतीभ्रष्ट बनवण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धतीलाच लक्ष्य केले. त्यानंतर खासगी संस्थांनी गेल्या काही वर्षांत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अक्षरश: दुकानदारी चालू केल्याचे चित्र सर्वांसमोर आहे. अनेक उद्योगपतींनी आपले कारखाने बंद करून शिक्षणसंस्था चालू केल्या आहेत. सध्याच्या विद्यापिठांकडूनही गेल्या २ दशकांत एकही लक्षवेधी संशोधन झाल्याचे ऐकिवात नाही.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणसंस्था चालू होऊनही परदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; कारण तिकडे गुणवत्तेवर मिळणारा शिक्षण प्रवेश, अधिक वेतनाच्या नोकर्‍या इत्यादींसह भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप पुष्कळ अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा शिक्षणक्षेत्रात अग्रेसर व्हायचे असल्यास देशातील शिक्षणाची खालावलेली स्थिती सुधारण्यासाठी तक्षशिला-नालंदाच्या तोडीची विद्यापिठे निर्माण करावी लागतील. तसे झाल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’ होण्यास वेळ लागणार नाही.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे