सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

संभाजीनगर – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘अब्दुल सत्तार यांनी २४ घंट्यांच्या आत क्षमा न मागितल्यास त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसने ७ नोव्हेंबर या दिवशी दिली. ‘सत्तार यांना ५० खोक्यांची मस्ती आली आहे. त्यांची मस्ती उतरवली जाईल’, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी अब्दुल सत्तार यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांचे त्यागपत्र घ्यावे, अन्यथा अब्दुल सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या घरांवर दगडफेक !

मुंबई आणि संभाजीनगर येथील सत्तार यांच्या घरांवर दगडफेक करून घराच्या काचा फोडण्यात आल्या. ‘एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचे त्यागपत्र घ्यावे अन्यथा त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले. ‘सत्तार ठाणे येथे आले, तर त्यांचे तोंड काळे करू’, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली.

राजकीय प्रतिक्रिया…

१. सौ. पंकजा मुंडे-पालवे, नेत्या, भाजप – कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलांविषयी आदरयुक्त टीका केली पाहिजे.

२. सौ. दीपाली सय्यद, नेत्या, शिवसेना – अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांनी स्वत:च शब्द मागे घेऊन क्षमा मागावी.

३. सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्ष, भाजप – महिलांचा अवमान करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार नव्हे, तर कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे वक्तव्य करू नये.

अब्दुल सत्तार यांनी मागितली क्षमा !

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यावर सत्तार यांनी क्षमा मागितली आहे. ते म्हणाले, ‘‘मी कुणाविषयीही काही बोललेलो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावेल, असे बोललो नाही. कुणाला वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो. मी केवळ खोक्याविषयी बोललो. महिलांविषयी एक शब्दही बोललो नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. क्षमा करा.’’

अब्दुल सत्तार यांनी कोणते आक्षेपार्ह वक्तव्य केले ?

संभाजीनगर येथील सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. त्या वेळी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘आमच्यावर खोके म्हणणारे लोक भिकार आहेत. इतकी भिकारXXX झाली असेल, तर सुप्रिया सुळे यांनाही (खोके) देऊ. ते आम्हाला ‘खोके’ बोलू लागले आहेत. आमचे खोके आणि त्यांचे डोके पडताळावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोड येथे दवाखाना उघडावा लागेल. हे भिकारXXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही प्रतिदिन लोकसभा आणि विधानसभा यांसाठी मतांची भीक मागतो’, असे वादग्रस्त वक्तव्य एकदा नाही, तर दोन वेळा केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे.