म्हैसुरू येथेे अन्वेषण विभागाच्या माजी अधिकार्‍याची हत्या

जिहादविषयी लिहिले होते पुस्तक

अन्वेषण विभागाचे माजी अधिकारी आर्.एन्. कुलकर्णी (डावीकडे)

म्हैसुरू (कर्नाटक) –  कर्नाटकातील म्हैसुरूमध्ये अन्वेषण विभागाचे माजी अधिकारी आर्.एन्. कुलकर्णी यांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूविषयी मोठा खुलासा समोर आला आहे. वास्तविक हा अपघात नसून हत्या होती. चारचाकीने त्यांना हेतुपुरस्सर धडक दिल्याचे पोलिसांना आढळून आले. ते शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी म्हैसुरू विद्यापीठ (गंगोत्री) येथील संगणक विज्ञान विभागाजवळ फिरायला गेले असता एका अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिली. त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कुलकर्णी यांना चारचाकीने धडक दिल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम अपघाताचा गुन्हा नोंदवला होता; मात्र पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज्’ पाहिल्यानंतर हे जाणूनबुजून केलेले कृत्य असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर जयलक्ष्मीपुरम् पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. हत्येच्या वेळी ते चालत नव्हते, तर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना धडक देणार्‍या गाडीला ‘नंबर प्लेट’ही नव्हती.

म्हैसुरू शहराचे पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्ता यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अन्वेषण चालू केले आहे. या प्रकरणी अन्वेषणासाठी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक सिद्ध करण्यात आले आहे. ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली  आहे कि व्यायसायिक जीवनाशी संबंधित आहे ?, हे अद्याप समजू  शकलेले  नाही. कुलकर्णी यांनी जिहादचे पितळ उघड पाडणारे ‘फॅसेट्स ऑफ टेररीजम इन इंडिया’ हे पुस्तक लिहिले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्  यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यासह त्यांनी अन्यही ३ पुस्तके लिहिली आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !