सोन्याचे अलंकार घातल्याने त्यातून तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होऊन देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे

सौ. रंजना गडेकर

१. मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्यांतून सोनेरी तेजोमय किरण प्रक्षेपित होतांना दिसणे

‘एप्रिल २०२० मध्ये मी खोलीत असतांना माझी दृष्टी माझ्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रातील वाट्यांकडे गेली. तिथे कोणत्याही प्रकारचा प्रकाश नव्हता. (दिवा लावलेला नव्हता.) जसे दिव्यातील ज्योतीतून किरण प्रक्षेपित होतांना दिसतात, तसे सोन्याच्या वाट्यांतून तेजोमय किरण वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसत होते. ते प्रक्षेपण शरिरापासून २ इंचांपर्यंत होतांना दिसत होते. त्या वेळी ‘सोन्यातील तेजतत्त्व वातावरणात कसे प्रक्षेपित होते ?’, हे मला अनुभवायला मिळाले. ‘मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने माझ्या देहावरील त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे त्या तेजाचे प्रमाण घटून ते २ इंचांपर्यंत प्रक्षेपित झाले असावे’, असे मला वाटते, नाहीतर ते अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाले असते.

२. सोन्यातील तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होण्याची प्रक्रियाविविध घटकांवर अवलंबून असणे

देहात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असेल, तर देहाने घातलेल्या सोन्याच्या अलंकारातून तेजतत्त्वाचे अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते; परंतु देहात नकारात्मक ऊर्जा अधिक असेल, तर अलंकारांवर त्रासदायक शक्तीचे आवरण (थर) येऊन सोन्याच्या अलंकारातील तेजतत्त्वाचे प्रमाण घटते.

३. धर्मशास्त्रानुसार देहाच्या प्रत्येक अवयवावर अलंकार घातल्यामुळे देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे

देहाच्या प्रत्येक अवयवावर धर्मशास्त्रानुसार तो तो अलंकार घातला जातो. त्यामुळे देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. देहावर धारण केलेल्या प्रत्येक अलंकारातून तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होते. त्यामुळे देहावर डोक्यापासून पायापर्यंत घातलेल्या सोन्याच्या अलंकारांनी देहाभोवती तेजतत्त्वाचे वलय निर्माण होऊन संरक्षककवच निर्माण होते. यातून अलंकार घालण्याचे महत्त्व लक्षात येते.

४. सोन्याच्या अलंकाराचे महत्त्व

कृत्रिम किंवा इतर धातूंनी बनवलेले अलंकार घालण्यापेक्षा सोन्याचे अलंकार घालणे महत्त्वाचे आहे. सोन्याचे दागिने धारण केल्यामुळे आपल्या देहाभोवती तेजतत्त्वाचे संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे अनिष्ट शक्ती करत असलेल्या आक्रमणांपासून आपले रक्षण होते.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.