६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिला तिची आई, आजी आणि काही संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

एका सत्संगामध्ये प्रार्थनाची आई सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), कु. प्रार्थना महेश पाठक आणि तिची आजी श्रीमती सुरेखा सरसर या उपस्थित होत्या. त्या वेळी एका संतांनी प्रार्थनाला विचारले, ‘‘आईकडून शिकतेस ना ?’’ तेव्हा प्रार्थना म्हणाली, ‘‘हो.’’ त्यानंतर तिने आईकडून शिकायला मिळालेली पुढील सूत्रे सांगितली.

कु. प्रार्थना पाठक

१. सौ. मनीषा पाठक (आई)  

अ. ‘माझी आई नेहमी सेवारत असते. ती दिवस-रात्र सेवाच करत असते. रात्री २ वाजेपर्यंत ती सेवा करते आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता नामजप करायला उठते.

आ. आई अनेक दिवसांपासून आजारी आहे, तरीही ती सतत आनंदी आणि हसतमुख असते.

इ. माझी आई झाशीची राणी आहे.

२. श्रीमती सुरेखा सरसर (आजी)

अ. आजीमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे ती स्तोत्रपठण आणि बालसंस्कारवर्ग चांगल्या पद्धतीने घेते.

(श्रीमती सुरेखा सरसर या सध्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास आहेत. आश्रमात बालसंस्कारवर्ग घेणे, मुलांना स्तोत्र शिकवणे या सेवा त्या करतात. – संकलक)

आ. तिच्यामध्ये पुष्कळ नम्रता आहे आणि ती काटकसरी आहे.

इ. तिच्यामुळे कोणताही बालसाधक कधीच दुखावला जात नाही.

३. पू. (कु.) रेखा काणकोणकर

पू. रेखाताई यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्या सर्वांची चांगली काळजी घेतात. त्या वृद्ध साधक, आजारी साधकांच्या पथ्याचे नियोजन व्यवस्थित आणि अतिशय प्रेमाने करतात.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यज्ञाला बसतात. तेव्हा त्या महालक्ष्मीच वाटतात. त्या ५ ते ६ घंटे अगदी स्थिरतेने बसतात. श्रीचित्‌‌शक्ति काकू आणि श्रीसत्‌शक्ति ताई यांच्याकडे पाहून ‘माझ्यात अशी स्थिरता कधी येणार ?’, असे मला वाटते.

५. ‘नवविधा भक्तीमधून मी कोणत्या भक्तीमार्गाचा अवलंब करू ?’, असे विचारणारी आणि संतांविषयी भाव असणारी प्रार्थना !

मला भक्तीमार्ग आवडतो; म्हणून मी सत्संगात विचारले, ‘‘नवविधा भक्तीमधून मी कोणत्या भक्तीमार्गाचा अवलंब करू ?’’ तेव्हा संतांनी सांगितले, ‘‘तुला जो सोपा वाटेल, त्या मार्गाने प्रारंभ कर.’’ त्यानंतर मी आत्मनिवेदन भक्तीला प्रारंभ केला. सत्संगात बोलतांना माझी भावजागृती होत होती. सत्संगाच्या शेवटी उभे राहून मी सद्गुरु काकांनी (सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी) गायलेले ‘तुम ही राम हो । तुम ही कृष्ण हो ।’ हे गीत म्हटले. तेव्हा संतांना ते पुष्कळ आवडले.

हे लिखाण लिहून घेतल्याविषयी परम पूज्य गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– परम पूज्य गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक, पुणे

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक