मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हॅलोवीन’ या पाश्‍चात्त्य कार्यक्रमाचे आयोजन !

  • सोहळ्यांवर लाखो रुपयांचा व्यय

  • पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचाही सहभाग

मुंबई  – पाश्‍चात्त्य देशात ३१ ऑक्टोबरला ‘हॅलोवीन’ हा दिवस पाळला जातो. यात भुते, हडळ यांच्यासारखी विकृत, भयानक वेशभूषा आणि केशभूषा करून तो दिवस साजरा केला जातो. यानिमित्त मुंबईत २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम मोठमोठी उपाहारगृहे (हॉटेल्स), निवासी संकुले, मॉल्स, कॅफे, शाळा आणि कार्यालये येथे साजरे करण्यात आले. (पाश्‍चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्‍चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे ! – संपादक)

१. अनेक ठिकाणी भयानक वेशभूषा करत मुलांनी घरोघरी जाऊन चॉकलेट आणि खाऊ यांची जमावजमव केली. अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही ‘हॅलोवीन’च्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये भयावह वेशभूषा करून त्यात सहभागी झाले होते. (भयानक भुताटकीसारखी वेशभूषा करून ‘हॅलोवीन’ साजरा करणारी भावी पिढी उज्ज्वल होईल का ? – संपादक)

२. मुंबईतील नरिमन पॉईट, वांद्रे, अंधेरी, जुहू, सांताक्रूझ, लोखंडवाला, खार, वरळी, पवई या भागांत ‘हॅलोवीन पार्टी’चे प्रमाण अधिक होते. या ‘पार्टी’साठी वापरले जाणारे भुतांचे मुखवटे, भयावह दिसणारे कोरलेले भोपळे, भोपळ्यांचे दिवे, टोप्या, भोपळ्यांची चॉकलेट्स, भयानक दिसण्यासाठी मेकअप साहित्य यांना पेठेत (बाजारात) पुष्कळ मागणी होती. ‘ऑनलाईन’ बाजारपेठेत ‘हॅलोवीन’साठीचे पोषाख आणि साहित्य सहज उपलब्ध होत असल्यामुळेही याविषयीच्या सोहळ्यांना प्रतिसाद वाढला’, असे मत काही उपाहारगृहाच्या व्यवस्थापकांनी नोंदवले.

३. हॅलोवीनच्या कार्यक्रमासाठी २०० रुपयांपासून ५ सहस्र रुपयांपर्यंत प्रवेशशुल्क आकारण्यात येत होते. एका मोठ्या हॉटेलने आयोजित केलेल्या सोहळ्यासाठी ५ सहस्र रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात आलेे होते. त्या सोहळ्याला ७०० जण उपस्थित होते. एका हॉटेलने साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करून ‘हॅलोवीन’ कार्यक्रमातून पुष्कळ पैसे कमावले. मुंबईतील अनेक मोठमोठी हॉटेल्स आणि मॉल्स यांनी यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला.

४. काही कॅफेमध्ये हॅलोवीनला पूरक अशा पद्धतीची सजावट आणि खाद्यपदार्थही सिद्ध केले होते. काही पदार्थांची नावेही त्यानुसार पालटण्यात आली.

५. पवईमधील एका हॉटेलमध्ये बालकेंद्री ‘हॅलोवीन’ अशी संकल्पना राबवण्यात आली होती. तेथे शेकडो मुले पालकांसह उपस्थिती होती. (पालकही अशा सोहळ्यांचे समर्थन करत असतील, तर मुलांवर काय संस्कार होणार ? – संपादक)

६. एका हॉटेलने पाळीव प्राण्यांसाठीही ‘हॅलोवीन’ आयोजित केले होते. त्याअनुषंगाने पाळीव प्राण्यांसाठीचेही भीतीदायक पोशाख ‘ऑनलाईन’ पेठेत उपलब्ध होते.

हॅलोवीन म्हणजे काय ?

अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही देशांत प्रतिवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘हॅलोवीन’ नावाचा एक उत्सव  जरा करण्यात येतो. ‘या दिवशी पृथ्वी आणि भुवलोक यांतील अंतर अल्प होते. त्यामुळे भुवलोकातील पितर पृथ्वीवर येतात’, अशी धारणा आहे. पितरांनी स्वतःच्या नातलगांना ओळखू नये; म्हणून हे लोक भूत, प्रेत, चेटकीण, पिशाच्च, राक्षस यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी तसे विचित्र पोषाख घालतात. स्वतःच्या घरांच्या प्रवेशद्वारांवरही अशीच भयानक आणि विकृत सजावट करतात. या दिवशी केलेल्या खाद्यपदार्थांनाही भुता-प्रेतांचे आकार दिलेले असतात.

संपादकीय भूमिका

  • पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय ! एरव्ही हिंदूंच्या श्रद्धांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे बुद्धीप्रामाण्यवादी भुताखेतासारख्या वेशभूषा सर्रास केल्या जाऊन त्याचे कार्यक्रम साजरे केले जात असतांना गप्प का ?
  • दीपावलीच्या काळात दीपोत्सव साजरा करून वातावरण प्रकाशमय करायचे आणि नंतर ‘हॅलोवीन’ साजरा करून भुताखेतांच्या अंधारमय जगात जायचे, हा धर्मशिक्षणाच्या अभावाचा मोठा दुष्परिणामच होय !  हिंदु राष्ट्रात हिंदूंना धर्मशिक्षण देण्यात येणार असल्याने असे प्रकार नसतील !
  • हिंदूंनो, पाश्‍चात्त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यापेक्षा भारतीय परंपरेनुसार सण-उत्सव साजरे करून त्यातून खरा आनंद अनुभवा !