भारत जोडो यात्रेत ‘कॉपीराईट’ असलेले संगीत वापरल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार !

(कॉपीराईट म्हणजे एखादी व्यक्ती अथवा आस्थापन यांच्याकडे असलेला एखादे गीत, संगणकीय प्रणाली अथवा पुस्तक यांचा कायदेशीर अधिकार)

KGF Chapter 2 Music सह भारत जोडो यात्रा प्रोमो व्हिडिओचा स्क्रीनशॉट

बेंगळुरू – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या अंतर्गत पक्षाने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘के.जी.एफ्. चॅप्टर २’ या चित्रपटातील ‘कॉपीराईट’ असलेले संगीत विनाअनुमती वापरले. यावरून या चित्रपटातील संगीताचे अधिकार असलेले बेंगळुरू येथील ‘एम्.आर्.टी. म्युझिक’ नावाच्या आस्थापनाने काँग्रेसी नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

या आस्थापनाने तक्रारीत म्हटले आहे, ‘‘आम्ही हिंदीतील ‘के.जी.एफ्. चॅप्टर २’च्या संगीताचे अधिकार मिळवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. तथापि काँग्रेसने स्वतःचे राजकीय धोरण (अजेंडा) पुढे रेटण्यासाठी या संगीताचा वापर केला आहे. काँग्रेसच्या या कृत्यातून जनतेत चुकीचा संदेश जाऊन त्यांचे हे कृत्य कॉपीराईटचे संरक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या अगदी विरुद्ध आहे.’’