पुणे येथे इतिहासप्रेमी मंडळाने कांचनबारीच्या (जिल्हा नाशिक) लढाईचा इतिहास जिवंत केला

सहस्रो दिवे, नकाशे आणि चित्रपटदृश्ये यांचा वापर करून उलगडली शिवरायांची शौर्यगाथा !

कांचनबारीच्या लढाईचा इतिहास दाखवणारी गडाची प्रतिकृती

पुणे – वर्ष १६७० मध्ये सूरत लुटून परत येत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी युद्ध करावे लागले. शत्रूच्या प्रदेशात असूनही युद्धनीतीचा चातुर्याने वापर करत मराठ्यांनी विजय मिळवला. ही विलक्षण शौर्यकथा इतिहासप्रेमी मंडळाने ४० X २५ फूट भव्य प्रतिकृतीतून ‘साउंड अँड लाईट शो’द्वारे उलगडली आहेत. सहस्रो दिव्यांतून साकारणारी युद्धकथा, चित्रपट दृश्ये आणि नकाशे यांचा प्रभावी वापर करत शिवरायांची शौर्यगाथा अभ्यासपूर्ण निवेदनातून सांगण्यात आली आहे. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा येथे कांचनबारीच्या लढाईचा इतिहास गडाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांनी केलेल्या पराक्रमाचे दर्शन घडवण्यासाठी वणी, धोडप, कांचना, चांदवड या सातमाळ रांगेची प्रतिकृतीही साकारण्यात आली होती. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी निवृत्त कर्नल निर्मलकुमार, ‘कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट’चे कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते.

शिवराज कदम जहागीरदार यांनी पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे महत्त्व विशद केले. या वेळी गिर्यारोहक ओंकार ओक आणि शिल्पकार विपुल खटावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी निवृत्त कर्नल निर्मलकुमार म्हणाले की, शिवरायांची युद्धनीती आजही भारतीय सैन्य दलात अनुसरली जाते.

इतिहासातील अपरिचित शौर्यगाथा

या वेळी इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले की, वर्ष १६७० च्या ऐन दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर धाड टाकून प्रचंड खजिना मिळवला. ही अनमोल संपत्ती घेऊन ते स्वराज्यात परत येत असतांना त्यांची मोगल सेनापती दाऊदखान कुरेशी याच्याशी गाठ पडली. वणी, दिंडोरी येथे हे भयंकर युद्ध झाले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन लढत होते. मोकळ्या मैदानात झालेल्या या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयश्री खेचून आणली. सातमाळ डोंगररांगेच्या भौगोलिक परिसराचा चातुर्याने वापर करत गनिमाची कोंडी केली. मोगलांचा पराभव करून राजे सर्व संपत्तीसह राजगडावर सुखरूप पोचले. इतिहासातील ही कथा अनेकांना अपरिचित आहे.