धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८६

वैद्य मेघराज पराडकर

१. चंद्रग्रहणाचा वेधकाळ

‘८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण आहे. या दिवशी वेधकाळात, म्हणजे सूर्याेदयापासून सायंकाळी ६.१९ वाजेपर्यंत अन्नग्रहण करणे निषिद्ध आहे. लहान मुले, अशक्त, रुग्णाईत व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेत, असे धर्मशास्त्र सांगते.

२. आयुर्वेदानुसार या ग्रहणकाळात कधी जेवावे ?

७.११.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत जेवावे. यानंतर थेट ८.११.२०२२ या दिवशी सायंकाळी ग्रहण संपल्यावर स्नान करून जेवण बनवून जेवावे लागेल. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी रात्री ८ ते ८.३० पर्यंत जेवण होईल. त्यामुळे साधारण २४ घंट्यांचा उपवास घडेल.
जे सकाळी ११ वाजल्यापासून वेधकाळ पाळणार आहेत, त्यांनी ग्रहणाच्या दिवशी सकाळी चहा किंवा अल्पाहार न घेता ११ वाजण्यापूर्वी थेट जेवून घ्यावे.

३. २४ घंट्यांचा उपवास केल्याने होणारे लाभ

‘माणसाला अन्नाची नितांत आवश्यकता असते’, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे ‘ऋषिमुनींनी ग्रहणासंबंधी एवढे कडक नियम का बरे घालून ठेवले आहेत ? असे नियम घालतांना ‘माणसाला ग्रहणकाळात भूक लागली, तर त्याला काहीतरी खाण्याची सूट द्यायला हवी’, असे धर्मशास्त्रकारांना का बरे वाटले नाही ? ते मानवजातीला भुकेलेले ठेवण्याएवढे ‘निष्ठुर’ का झाले ?’, असे प्रश्न पडू शकतात. पुढे दिलेले उपवासाचे लाभ समजून घेऊन एकदा स्वतः उपवास करून ते अनुभवल्यावर मात्र आपल्याला ऋषिमुनींप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल. २४ घंटे उपवास केल्याने पुढील
लाभ होतात.

अ. रक्तातील अतिरिक्त साखर वापरली जाते आणि मधुमेह होण्याचा धोका न्यून होतो.

आ. यकृत, तसेच शरिरात इतरत्र साचलेला मेद (चरबी) न्यून होण्यास आरंभ होतो.

इ. हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास आरंभ होतो. नियमित शास्त्रीय पद्धतीने उपवास केल्यास हृदयविकार होण्याची शक्यता न्यून होते.

ई. पोटाला, तसेच आतड्यांना पूर्ण विश्रांती मिळते. त्यामुळे एकूणच पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास साहाय्य होते.

उ. अन्नमार्गामध्ये व्रण झाले असल्यास ते भरून येण्यास साहाय्य होते.

ऊ. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

ए. शरिरातील हानीकारक जंतू, तसेच जीर्ण पेशी मरू लागतात. त्यामुळे जंतूंचा संसर्ग (इन्फेक्शन) असल्यास तो बरे होण्यास आरंभ होतो.

ऐ. कर्करोगाच्या पेशी मरू लागतात. (‘दीर्घकालीन उपवास’ हा कर्करोगावरील उपचार होऊ शकतो का ? याविषयी विदेशात संशोधन चालू आहे.)

ओ. मोठ्या आतड्यामध्ये असंख्य जीवजंतू असतात. यांतील बहुतेक जीवजंतू शरिराला उपकारक असतात. उपवासामुळे हानीकारक जीवजंतू मरतात; पण उपकारक जीवजंतूंमध्ये वाढ होते. त्यामुळे आरोग्य चांगले रहाते.

औ. शरिरातील संप्रेरकांमध्ये (‘हॉर्माेन्स’मध्ये) संतुलन निर्माण होण्यास आरंभ होतो.

अं. मेंदूतील पेशींमध्ये नवीन जाळे निर्माण होण्यास आरंभ होतो. त्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. यामुळे झोप, स्मृती इत्यादींचे कार्य सुधारते.

क. शरिरात नवीन पेशी निर्माण होतात. नियमित शास्त्रीय पद्धतीने उपवास केल्यास वार्धक्य उशिरा येते.

४. २४ घंटे उपवास करणे मला शक्य होईल का ?

‘खाल्ल्याविना मी जगूच शकत नाही’, असा मोठा अपसमज अखिल विश्वातील मानवजातीमध्ये आहे. हा अपसमज दूर झाला की, कुणालाही सहजपणे चोवीसच काय; पण त्याहूनही अधिक घंटेही उपवास करणे सहज शक्य आहे. हा अपसमज दूर होण्यासाठी पुढील तथ्ये
समजून घ्याव्यीत.

अ. ५० किलोग्रॅम वजनाची कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण न करता केवळ पाणी पिऊन ५० दिवस सहजपणे जगू शकते. आपल्या शरिरात एवढा संचित अन्नाचा साठा असतो. आपल्याला तर ग्रहणकाळात केवळ १ दिवस उपवास
करायचा आहे.

आ. एकसारखे खाण्याची सवय लागल्याने शरिरातील संचित अन्नाचा साठा कधीच वापरला जात नाही. त्यामुळेच लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार हे रोग वाढत आहेत. हा साठा वापरला जावा, यासाठी उपवास साहाय्यक ठरणार आहे.

इ. खाण्याची वेळ झाली की, सवयीनुसार भूक लागणारच; परंतु त्या वेळेत काही खाल्ले नाही, तर थोड्या वेळाने ही भूक जाते. ‘वेळ झाली की, भूक लागणे’, हे शरिरातील संप्रेरकांच्या (‘हॉर्माेन्स’च्या) कार्यामुळे घडत असते.

ई. मनाचा दृढ निश्चय झाल्यास कुणीही, म्हणजे कृश व्यक्तीसुद्धा २४ घंटे उपवास सहज करू शकते.

उ. धर्मशास्त्रात एकादशी, चतुर्थी, ग्रहणकाळ इत्यादी वेळी उपवास सांगितले आहेत. सामान्य माणूस ते करू शकतो; म्हणूनच शास्त्रकारांनी ते सांगितले आहेत. तसे करणे शक्य नसते, तर शास्त्रकारांनी ते सांगितलेच नसते.

ऊ. धर्मशास्त्रात चांद्रायण व्रत, कृच्छ्र व्रत यांसारखी प्रायश्चित्ते सांगितली आहेत. यांमध्ये अनेक दिवसांपर्यंत दिवसातून एकदाच आणि तेही अत्यंत मर्यादित प्रमाणात भोजन करण्यास सांगितले आहे. आपल्याला केवळ २४ घंटे उपवास करायचा आहे.

ए. समर्थ रामदासस्वामी प्रतिदिन १२०० सूर्यनमस्कार घालत आणि हाताच्या ओंजळीत मावेल एवढीच माधुकरी मागून आणलेले जेवण गोदावरीच्या पात्रात धुऊन ग्रहण करत. त्यामुळे शक्ती केवळ अन्नाने मिळते, हा अपसमज आहे.

ऐ. आताच्या काळातही दिवसातून केवळ एकदा जेवणारे लोक आहेत. ‘ईश योग संस्थे’चे सद्गुरु जग्गी वासुदेव दिवसातून केवळ एकदाच जेवतात, म्हणजे त्यांचा प्रतिदिन साधारण २४ घंट्यांचा उपवास घडतो. एवढे असूनही ते पूर्ण क्षमतेने कार्यरत असतात, तसेच देशविदेशांत दुचाकीवरून भरपूर प्रवासही करत असतात.

ओ. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ४४ वर्षे नवरात्रीचे ९ दिवस केवळ मर्यादित फलाहार आणि पाणी पिऊन उपवास करतात. त्या काळातही ते पूर्ण क्षमतेने कार्यरत असतात.

औ. आय्.ए.एस्.एस्. (International Association For Scientific Spirtualism) नावाच्या मेरठ, उत्तरप्रदेश येथील संस्थेमध्ये ७ – ७ दिवस विनाअन्न उपवास करण्याची शिबिरे घेतली जातात. या शिबिरांमध्ये लोक ७ दिवस काही न खाता केवळ पाणी पिऊन अनेक रोगांतून मुक्त होतात.

अं. विदेशामध्ये ४० – ४० दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करणारे अनेक लोक आहेत. तेथे उपवासावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. आपल्याला तर केवळ १ दिवस उपवास करायचा आहे.

क. भावी भीषण आपत्काळात अन्न सहज उपलब्ध होणार नाही. त्यासाठीची सिद्धता म्हणूनही १ दिवसाचा उपवास करून पहाता येईल.

५. ग्रहणकाळात २४ घंटे उपवास कसा करावा ?

अ. उपवास करण्याचा दृढ निश्चय करून तो पूर्ण करवून घेण्यासाठी आपल्या उपास्य देवतेला प्रार्थना करावी.

आ. ग्रहणाच्या आदल्या रात्री जेवावे. त्यानंतर काही खाऊ नये.

इ. या काळात पाणी पिऊ शकतो; परंतु एका वेळी अधिक प्रमाणात पाणी न पिता थोडे थोडे प्यावे. एका वेळी अधिक प्रमाणात पाणी प्यायल्यास अधिकचे पाणी लघवीवाटे बाहेर निघून जाते. त्या पाण्याचा शरिराला काही उपयोग होत नाही. कुंडीतील झाडाला भरपूर पाणी घातल्यावर कुंडीच्या खालच्या छिद्रातून पाणी बाहेर निघून जाते, तसे हे आहे. झाडाला नीट पाणी मिळावे, म्हणून ठिबक सिंचन करतात. यामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.

ई. उपवास करतांना पुरेसे पाणी प्यायल्यास अजिबात थकवा येत नाही, पित्त होत नाही, तसेच डोकेदुखीही होत नाही.

उ. ग्रहणाच्या पर्वकाळात, म्हणजे ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६.१९ वाजेपर्यंत, म्हणजे ग्रहण संपेपर्यंत पाणीही पिऊ नये.

ऊ. या काळात आपण नेहमीची सर्व कामे, कष्टाची कामे, तसेच व्यायामही करू शकतो.

ए. ग्रहणकाळात दुपारी झोपू नये. झोप अनावर झाल्यास बसल्या बसल्या डुलकी घ्यावी.

ऐ. ग्रहण संपल्यावर भूक लागली, म्हणून लगेच दिवाळीचा फराळ किंवा अन्य काही खाऊ नये.

ओ. ग्रहण संपल्यावर अंघोळ करून वरणभात किंवा मूगडाळीची खिचडी यांसारखा हलका आहार १ – २ चमचे तूप घालून घ्यावा.

औ. दुसर्‍या दिवसापासून नेहमीप्रमाणे आहार घ्यावा.

६. मधुमेही रुग्णांनी उपवास करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा

मधुमेहासाठी ॲलोपॅथीच्या गोळ्या किंवा ‘इन्सुलीन’ चालू असल्यास मात्र उपवास करण्यापूर्वी आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन त्यानुसार त्या दिवसाच्या गोळ्यांची मात्रा ठरवून घ्यावी. सामान्यपणे विनाअन्न उपवासाच्या दिवशी मधुमेहाचे कोणतेही औषध घेऊ नये, असे असते; परंतु तरीही आपल्या वैद्यांना विचारून याविषयी ठरवावे.

७. उपवास करतांना त्रास झाल्यास काय करावे ?

वर दिल्याप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन उपवास केल्यास त्रास होत नाही; परंतु तरीही त्रास झालाच, तर पुढे दिल्याप्रमाणे उपचार करावेत.

७ अ. डोकेदुखी : उताणे झोपून दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ – २ थेंब तूप किंवा खोबरेल तेल घालावे. चमचाभर खोबरेल तेलात २ ते ४ चिमूट कापूर मिसळून ते डोक्याला लावावे.

७ आ. पित्त वाढल्याने मळमळणे किंवा उलटी होणे : उलटी सहजपणे होण्यासाठी पेलाभर पाणी पिऊन जिभेवर बोटे घासावीत. वाढलेले पित्त पडून गेले की, उलटी थांबते. पित्त पडून गेल्याने पुष्कळ बरे वाटते; परंतु उलटी होत नसल्यास मुद्दामहून ती करण्यासाठी प्रयत्न करू नयेत. उलटी न झाल्यास प्यायलेले पाणी लघवीवाटे बाहेर निघून जाईल आणि त्यासह पित्तही लघवीवाटे निघून जाईल.

७ इ. मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर न्यून होणे : थरथरायला होणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, घाम येणे, छातीत धडधडणे यांसारखी रक्तातील साखर न्यून होण्याची लक्षणे निर्माण झाल्यास साखर किंवा गूळ खावा आणि पाणी प्यावे. (मधुमेह नसल्यास केवळ पाणी प्यावे.)

८. उपवास करण्यासाठी मनाची सिद्धता करा !

उपवास करण्यासाठी मनाची सिद्धता होण्यासाठी हा लेख वारंवार वाचावा. तरीही मनाची सिद्धता न झाल्यास उपवास करू नये. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने कुणी कुणाला आग्रह करू नये. स्वतःचा निश्चय झालेला असेल, तर मात्र अवश्य २४ घंटे उपवास करून अनुभव घ्यावा.
‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ म्हणजे ‘जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म, म्हणजे ईश्वर करतो’. धर्माचरणाने धर्माचे रक्षणच होते. ग्रहणकाळात धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार आचरण करण्यासाठी सर्वांना शक्ती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२२)