स्वतंत्र भारतातील सैनिकांचे पारतंत्र्य !

भारतीय सैन्य’ म्हटले की, प्रत्येकच भारतियाला त्याच्याविषयी अभिमान वाटतो. सैनिकांनी सैन्यदलात चांगली कामगिरी बजावली, शत्रूंचा बीमोड केला की, सर्वांचीच छाती गर्वाने फुलून येते. प्रत्येक सैनिक राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असतोच; पण बर्‍याचदा त्यांना ‘वरून येणार्‍या’ आदेशांची वाट पहावी लागते. याच अनुषंगाने भारतीय सैन्याच्या ‘चिनार कोर्प्स’चे कमांडर लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला यांनी विधान केले. ते म्हणाले, ‘‘कोणतेही आदेश मिळाल्यास कारवाई करण्यास सैन्य पूर्णपणे सिद्ध आहे. आम्ही आमच्या क्षमतेत आणखी वाढ करत आहोत. आदेश मिळाल्यास आम्ही मागे वळून पहाणार नाही.’’ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, ‘‘भारत पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोचल्यानंतरच काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार होत असून त्याचे पाकला गंभीर परिणाम भोगावे लागतील.’’ या पार्श्वभूमीवर कमांडर लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण आणि तितकेच गंभीरही आहे; कारण सैन्यदलाला आदेशाची वाट पहावी लागणे, हे दुर्दैवी आहे. आज शत्रूराष्ट्रे सर्वच बाजूंनी भारताला घेरत आहेत; वारंवार कुरघोडी करत आहेत; भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देतांना अनेक सैनिकांना प्राण गमवावे लागत आहेत. कुणीही यावे आणि भारताला वाकुल्या दाखवून जावे, हे असे आणखी किती काळ चालू ठेवायचे ? अर्थात्च त्यासाठी सैन्याला कारवाई करण्याचे ठोस आदेश वारंवार मिळायला हवेत. केंद्र सरकार आणि सैन्यदले यांनी योग्य समन्वय साधून सैन्याला आदेश दिल्यास ते शत्रूराष्ट्रांना योग्य प्रकारे धडा शिकवतील, हे निश्चित आणि भारताकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस काय, तर कुणी तसा साधा विचारही मनात आणू शकणार नाही. इतका भारताचा दरारा संपूर्ण विश्वात निर्माण होईल. भारताची युद्धसज्जता कितीही असली आणि आपण संरक्षणदृष्ट्या परिपूर्ण जरी असलो, तरी मनगटात बळ, अंगात धमक अन् हृदयात राष्ट्राभिमान असावाच लागतो; कारण रणभूमीवर केवळ शस्त्रे नव्हेत, तर हेच बळ, हीच धमक आणि हाच राष्ट्राभिमान कार्य करत असतो. आदेशाच्या प्रतीक्षेत असणार्‍या प्रत्येक सैनिकामध्ये हे बळ, धमक आणि राष्ट्राभिमान आहेच, हे सरकारने लक्षात घ्यावे.

भारताने आतापर्यंत ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून शत्रूंना काही प्रमाणात देशाचे सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रतिवर्षी दिवाळीच्या कालावधीत सैनिकांना भेटून त्यांचे मनोधैर्य उंचावत आहेत. २६ जानेवारीच्या दिवशी तिन्ही सैन्यदले स्वतःचे युद्धसामर्थ्य विविध प्रात्यक्षिकांद्वारे देशवासियांना दाखवतात; पण खेदाची गोष्ट म्हणजे ती युद्धसामुग्री केवळ १ दिवसापुरतीच बाहेर येते आणि पुन्हा आपापल्या जागी जाते.

देशहितकारक धोरणाचा अभाव !

स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना वाटायचे की, भारताला कुणीच शत्रू नाही. त्यामुळे त्या काळात सैन्यावर खर्चच केला गेला नाही. मुळात संरक्षणाच्या दृष्टीने तत्कालीन सरकारची मानसिकताच नव्हती. त्यामुळे ते सरकार गाफील राहीले. कालांतराने पाकिस्तानने केलेली आक्रमणे, वर्ष १९६२ मध्ये चीनने केलेले आक्रमण हे सर्वच भारताला महागात पडले. त्यामुळे युद्धसज्जता आणि शस्त्रास्त्रे यांची आवश्यकता भासू लागली. नेहरूंची तत्कालीन निष्क्रीयता आणि देशहितकारक धोरणांचा अभाव यांचे दूरगामी अन् भीषण परिणाम आजही देश भोगत आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर’ ही तेव्हाची जखम आजही भळभळतच आहे. नेहरूंच्या कारकीर्दीत संरक्षणाच्या स्तरावर पुष्कळ मोठी पोकळी निर्माण झाली होती. या स्थितीचा अपलाभ शत्रूराष्ट्रांनी घेऊन भारतावर आक्रमणांची टांगती तलवारच ठेवली; पण हे चित्र पालटले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात ! तेव्हापासून सैन्य आणि युद्धाची रणनीती यांच्यात पुष्कळ पालट करण्यात आले. याचा परिणाम म्हणून विश्वात संरक्षणदृष्ट्या भारताची प्रतिमा आता पालटत चाललेली आहे. या क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनेही पावले टाकत आहे. त्यामुळे ‘भारत बचावात्मक नव्हे, तर युद्धपावित्र्यात आहे’, हे आता शत्रूराष्ट्रांना कळून चुकलेले आहे. त्यांनाही भारताची एक प्रकारे धास्ती आहेच ! हा आहे राष्ट्राच्या कणखर नेतृत्वाचा परिणाम ! कुठे तत्कालीन नेभळट पंतप्रधान नेहरू आणि कुठे राष्ट्रहितैषी भूमिका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ! मोदींकडून होणारी संरक्षण क्षेत्रातील प्रगती गौरवास्पद आहेच; पण ‘सैन्याधिकार्‍यांनी केलेल्या आदेशाच्या प्रतीक्षेत असण्याच्या विधानाचाही येथे सखोल विचार व्हायला हवा’, असे जनतेला वाटते.

खरेतर राष्ट्राचे संरक्षण करणार्‍या सैनिकांवर आदेशाची वाट पहाण्याची वेळच का येते ? हे ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी दुर्दैवी नव्हे का ? नुकतीच आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे मोठ्या थाटामाटात साजरी केली. विविध कार्यक्रम आणि सोहळे यांचेही या निमित्ताने आयोजन केले; पण काश्मीरचा काही भाग अजूनही पाकमध्ये आहे. तो मिळवण्यासाठी सैनिकांना वर्षानुवर्षे आदेशाची वाट पहावी लागते, ही स्थिती म्हणजे स्वातंत्र्य निश्चितच नाही. प्रत्येक सैनिकासाठी हे स्वातंत्र्यातील एक प्रकारचे पारतंत्र्यच आहे. थोडक्यात काय, तर ‘स्वतंत्र भारतातील सैनिक पारतंत्र्यात आहेत’, असे खेदाने म्हणावे लागत आहे. आदेश न देण्यामागील अडचणी किंवा कारणमीमांसा भारतियांसमोर यायलाच हव्यात. ‘उरी : दि सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील सैन्याधिकार्‍याच्या ‘हाऊज द जोश ?’ या प्रश्नाला सर्वच सैनिक ‘हाय (high) सर’ असे प्रत्युत्तर देतात. हे प्रत्युत्तर कृतीतून दर्शवण्याची संधी त्यांना आता लाभली पाहिजे. भारतीय सैनिक शौर्य आणि पराक्रम यांची वाट पहातच आहे. एकेक भारतीय सैनिक शत्रूला भारी पडू शकतो. आता केवळ प्रतीक्षा आहे, ती आदेशाची आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात सामावून घेत पाकची शकले उडवण्याची !