पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा !
मुंबई – केंद्रशासनाने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प संमत केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधानांनी वरील माहिती दिली.
पंतप्रधान म्हणाले…
१. केंद्रशासन देशभरात पायाभूत सुविधा, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करत आहे. यांपैकी काही प्रकल्पांवर सध्या काम चालू आहे किंवा काही प्रकल्प लवकरच चालू होतील. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो प्रकल्पांना संमती दिली आहे.
२. महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ सहस्र कोटी आणि रस्त्यांसाठी ५० सहस्र कोटी रुपये इतका निधी केंद्रशासनाने संमत केला आहे. पायाभूत सुविधांवर केंद्रशासन इतकी मोठी रक्कम व्यय करत असेल, तर त्यामधून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील.
३. केंद्रशासनाकडून ग्रामीण भागात बचतगटांना प्रोत्साहन दिले जात आहे. मागील ८ वर्षांमध्ये बचतगटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचतगटांना केंद्रशासनाने साडेपाच लाख कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देऊ केले आहे. या बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वत: उत्पादन सिद्ध करतात, तसेच अन्यांनाही रोजगार देतात.