७ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील बाणगंगा येथे होणार महाआरती !

डावीकडून  दीपक वालावलकर, अवधूत दाभोलकर, ऋत्विक औरंगाबादकर, शशांक गुळगुळे, डॉ. विजय जंगम  आणि बळवंत पाठक

मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबईतील काशी म्हणून ओळख असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या (७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे मानद सचिव श्री. शशांक गुळगुळे यांनी २ नोव्हेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. अवधूत दाभोलकर, तसेच श्री. दीपक वालावलकर, अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रमुख डॉ. विजय जंगम (स्वामी), हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर या वेळी उपस्थित होते.

याविषयी माहिती देतांना श्री. शशांक गुळगुळे म्हणाले, ‘‘वाळकेश्वर मंदिर हे अतीप्राचीन आहे. या मंदिराच्या समोर गौड सारस्वत ब्राह्मण ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी  बाणगंगेची महाआरती करण्यात येते. या आरतीसाठी सहस्रावधी दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. वाराणसीप्रमाणे येथेही गंगेचे पूजन होते. या भावपूर्ण सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांनी आवर्जून उपस्थित रहावे. या सोहळ्यासाठी दिनेश सहारा फाऊंडेशनचेही सहकार्य लाभणार आहे.’’

सर्व हिंदु बांधवांनी महाआरतीमध्ये सहभागी व्हावे ! – बळवंत पाठक, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा ही मुंबईमधील ऐतिहासिक स्थाने आहेत. प्रभु श्रीरामाने स्वतः बाणाने या तलावाची निर्मिती केली. एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राप्रमाणे हे स्थान आहे. त्यामुळे सर्व हिंदु बांधवांनी बाणगंगेच्या महाआरतीमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा.

बाणगंगा हे तीर्थक्षेत्र ‘बाणगंगा कॉरिडॉर’ निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – विजय जंगम (स्वामी), प्रमुख अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

बाणगंगा हे प्रवित्र आणि प्राचीन असे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे होणार्‍या सोहळ्याला मुंबईकरांनी उपस्थित रहावे. वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रमुख आचार्य धर्मगुरु जगद्गुरु श्री श्री श्री १००८ राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यामध्ये हा सोहळा होईल. या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी श्री ष ब्र १०८ निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, पाटण आणि श्री ष ब्र १०८ मणिकंठ शिवाचार्य दहीवडकर महाराज उपस्थित रहाणार आहेत. राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहातील. शिवभक्त आणि हिंदु धर्मप्रेमी यांनीही या सोहळ्याला उपस्थित रहावे आणि ‘बाणगंगा कॉरिडॉर’ निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत !